तुमसर (भंडारा) : ‘तू ड्युटी बरोबर करीत नाही,’ असे म्हणत डॉक्टरने परिचराला जवळ बोलावले आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हातातील काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार त्याच रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि डॉक्टर थेट कारागृहात पोहोचला. तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ कुणी काढला, अशी चर्चा असताना एका रुग्णाने तो चित्रित केल्याचे पुढे आले आहे.
तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सागर दिलीप कळसकर (२९) याने परिचर नारायण गोमा उईके (५२) याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. आदिवासी संघटना आक्रमक झाल्या. डॉक्टरांच्या अटकेची मागणी करू लागल्या. शेवटी बुधवारी रात्री डॉक्टरवर गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटकही करण्यात आली. मात्र आरोग्य केंद्रातील हा व्हिडिओ कुणी काढला? अशी चर्चा दिवसभर भंडारा जिल्ह्यात होती. दरम्यान, हा व्हिडिओ त्याच आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने काढल्याचे पुढे आले. हा व्हिडिओ चित्रित झाला नसता तर डॉक्टरचा हा महाप्रताप पुढे आला नसता आणि सर्वसामान्य परिचर आपल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिसातही गेला नसता. आदिवासी संघटनांनी हा व्हिडिओ पाहून आंदोलनाचा इशारा दिला आणि डॉक्टर गजाआड झाला.
आदिवासी संघटना एकवटल्या
आदिवासी कर्मचाऱ्याला काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबणाऱ्या डॉक्टरांचा हा व्हिडिओ बुधवार सायंकाळपासून जिल्ह्यात व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटना एकवटल्या. एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेला डॉ. सागर कळसकर हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने माणुसकीला काळिमा फासत एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. या अशोभनीय घटनेचा आदिवासी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांच्यामार्फत वरिष्ठांकडे केली.
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप
वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.