खाद्य तेलाच्या किमती सरकारने सर्वसामान्यांसाठी कमी कराव्यात, अशी मागणी केली जात होती. सर्वाधिक दर असलेल्या शेंगदाणा तेलाच्या किमती २०० वरून १८० तर सूर्यफूल तेलाचे दर १९० वरून १८० वर आले आहेत. सोयाबीन तेल १७० वरून १५० वर, पाम तेल १५० वरून १४० वर, सरसु तेल २०० वरून १८० वर आले आहे. सोयाबीन तेलाच्या किमतीत सर्वाधिक घट झाली आहे. गत तीन-चार महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावाने उच्चांक गाठला होता. याची झळ गोरगरिबांना बसत होती. आता सोयाबीन तेल तब्बल १७० वरून १५० रुपये किलोवर पोहोचल्याने किंचीत दिलासा मिळाला आहे. होलसेलने जवळपास यापेक्षा काही रुपयांची सवलत मिळत आहे. यापूर्वी १५ किलोच्या डब्यासाठी २३०० ते २४०० रुपये मोजावे लागत होते. एवढे महागीचे तेल घेणे सर्वसामान्य नागरिकांना परवडत नव्हते. त्यामुळे संसाराचा जेमतेम खर्च भागवित असताना एवढ्या महागीचे तेल खायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य मजूरवर्गाला पडत होता. आता काहीसा दिलासा मिळणार आहे.
बॉक्स
गृहिणींचे बजेट कोलमडले
महिला वर्गाला रोजच्या स्वयंपाकासाठी खाद्यतेलाची नितांत गरज असते. त्याशिवाय स्वयंपाक होऊच शकत नाही. तथापि, गेल्या चार-पाच महिन्याअगोदर तेलाचे भाव शंभर रुपये किलोच्या आतच होते; मात्र आता अचानक जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून तेलाने भावात एकदम मोठी वाढ झाल्याने महिलांना खाद्यतेलाअभावी स्वयंपाक करणे कठीण बनले आहे. स्वयंपाकगृहातील आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. भाववाढीचे रडगाणे कोणालाच सोसवेना झाले आहे. खाद्यतेलाचा साठा करीत ठोक खाद्यतेल विक्रेते चढ्या दराने तेलाची विक्री करीत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठी आर्थिक लूट होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. तेलाचे दर वाढले सतानाही लोकप्रतिनिधी मात्र गप्प का? असा प्रश्नही सर्वसामान्य गृहिणींमधून विचारला जात आहे.
कोट
आमच्या वडिलांच्या काळातही चांगले तेल घाण्यावरून मिळायचे; मात्र आता दुकानात एवढे महागाईचे तेल घेऊनही त्याची गुणवत्ता चांगली नाही. याशिवाय प्रचंड दरवाढ व जिल्ह्यात वन्य प्राण्याचा असलेला त्रास यामुळे सूर्यफूल, भुईमूगसारखी पिके आम्हाला वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे घेता येत नाहीत.
दीपक गिर्हेपुंजे, शेतकरी, खरबी नाका.
कोट
सूर्यफूल तेलाचा दर जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रतिकिलो १४० होता. तर सध्या एक किलो सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना १८५ रुपये मोजावे लागत आहेत. हीच अवस्था शेंगदाणा तेलाची आहे. खाद्यतेलाचे दर इतके वाढले आहेत, त्या तुलनेत बळीराजाच्या शेतमालाला मात्र तेवढा सरकार भाव देत नाही.
धनराज आकरे, शेतकरी, खरबी नाका.