भंडारा : कोरोना महामारीच्या संकटकाळात सेवा देणाऱ्या कंत्राटी नर्सेसच्या पुनर्नियुक्तीसाठी आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक फिक्स करण्यात यावी म्हणून खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देत साकडे घालण्यात आले. दरम्यान कंत्राटी नर्सेसचे २० व्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिले. अजूनपर्यंत शासन- प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलनात सहभागी असलेल्या नर्सेसवर उपासमारीची वेळ आली आहे.
खा. प्रफुल्ल पटेल हे राज्याच्या महाविकास आघाडी सरकारचे मोठे नेते आहेत. त्यांनी मनावर घेतल्यास आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक होऊ शकते व हा प्रश्न सहज सुटू शकतो, असे या कंत्राटी नर्सेसचे म्हणणे आहे. तीन महिने सेवा दिल्यानंतर १३ जुलै २०२१ पासून कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी नर्सेसनी पुनर्नियुक्तीच्या मागणीसाठी २५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा २०वा दिवस आहे. परंतु शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुनर्नियुक्ती व आरोग्य सेवेत एएनएमची थेट भरतीची मागणी आहे.
खरं तर कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कायम आहे. तसेच आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात पद रिक्त आहेत. ती भरल्यास कंत्राटी नर्सेसचा प्रश्न तर सुटेलच, पण आपली आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होईल, जी काळाची गरज आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व कामगार विभागाने कंत्राटी नर्सेसना पुनर्नियुक्ती, रिक्त पदांची भरती व एएनएमला प्राधान्य न दिल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे आवाहन कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व आयटकचे जिल्हा सचिव हिवराज उके,लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम व युनियनच्या सचिव मनीषा तीतिरमारे यांनी केले आहे.