लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अड्याळ येथील वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे हे वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून निलंबनाची धमकी देत असल्याची तक्रार दिल्याननंतर उपवनसंरक्षकांनी सखोल चौकशी करीत कारवाई करावी, या मागणीला घेऊन गुरुवारला महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल व वन कर्मचारी संघटनेच्या वतीने भंडाऱ्यातील वन कार्यालयात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व संघटक ललीतकुमार उचिबगले यांनी केले. यावेळी वनपाल वनरक्षक व वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर डीएफओंशी यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अड्याळाचे आरएफओ घनश्याम ठोंबरे हे अड्याळ परिक्षेत्रात रुजू झाल्यापासून त्यांचे वन कर्मचाऱ्यांशी असभ्य वागणूक असल्याचा आरोप आहे. शिवीगाळ करणे, धमकी देणे व निलंबनाची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. १० ऑगस्ट २०२४ ला बिटरक्षक एन. पी. पारधी यांनी घटनेची माहिती देण्यासंदर्भात वनपरिक्षेत्राधिकारी ठोंबरे यांना फोन केला असता, 'सकाळी फोन का केला, माझी झोपमोड केली, असे बोलून शिवीगाळ केली. तसेच जुने प्रकरण काढून निलंबित करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. ठोंबरे हे क्षेत्रातील एक दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरून इतर कर्मचाऱ्यांवर दहशत घालून हेतू पुरस्पर वागणूक करीत असल्याचे निवेदनात आरोप करण्यात आला आहे. क्षेत्र सहाय्यक शामकुवर व इतर वनरक्षकांना ग्रामस्थांच्या समक्ष शिवीगाळ केल्याचे व निलंबित करण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद आहे. यासह अन्य मागण्यांना घेऊन केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील व केंद्रीय संघटक ललितकुमार उचीबगले यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षकांना भेट घेत चर्चा करण्यात आली. या सर्व सर्वच प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकशी समिती गठीत आरएफओ घनश्याम ठोंबरे यांच्यावर केलेल्या यांच्यावर संघटनेने केलेल्या आरोप संदर्भात उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी चौकशी समिती गठित केली आहे. येत्या दहा दिवसात सविस्तर चौकशी करून अहवाल देण्याबा- बतचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशनचेही निवेदन देवरी येथील वनरक्षक नितीन पारधी यांनी आरएफओ ठोंबरे यांना वारंवार अरेरावी करून त्यांचा अपमान केल्याची तक्रार आहे. या संदर्भात फॉरेस्ट रेंजर असोसिएशन महाराष्ट्रतर्फे भंडारा उपवनसंरक्षक यांना २० ऑगस्ट रोजी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २८ सप्टेंबर २०२३ रोजी मासिक सभेत पारधी यांनी शाब्दीक अपमान केल्याचा आरोप आहे. तसेच २८ फेब्रुवारी 2024 तर ९ ऑगस्ट २०२४ रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयात क्षेत्र सहाय्यक शामकुवर यांच्यासोबत येऊन वाद घालण्याचा प्रयत्न केल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे. पारधी व शामकुवर हे मुख्यालयी न राहता लाखनी व भंडारा येथून जाणे येणे करत असल्याचा म्हटले आहे. शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्वच प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. निवेदन उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी स्वीकारले. यावेळी अन्य अधिकारी उपस्थित होते.