जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी : माध्यम प्रतिनिधींशी साधला संवाद भंडारा : भंडारा जिल्ह्यात शेतीपुरक व्यवसायाला प्रचंड वाव असून शेतीपूरक व्यवसायासोबत कौशल्य विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण, जोडधंदे, जलयुक्त शिवार, माजी मालगुजारी तलावांची दुरूस्ती व खोलीकरण, भाजीपाला क्लस्टर आणि पर्यावरणपूरक पर्यटन या विषयांवर आपला भर राहणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद सभागृहात शुक्रवारला माध्यमांशी संवाद साधला. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत चागले असून हा पावसाचे पाणी अडविल्यास त्याचा सिंचनासाठी वापर करणे सोयीचे होईल. मामा तलाव व जुन्या तलावांची संख्या मोठया प्रमाणात असून या तलावांचे सर्वेक्षण करुन नुतनीकरण व दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य दिल्यास त्याचा सिंचनासाठी फायदा होणार आहे, असे सांगितले. दुबार पेरणीसाठीसुध्दा या तलावातील पाणी उपयोगी पडेल. यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकासाला प्राधान्य दिल्यास शेती सोबत पुरकव्यवसाय व शेती आधारित जोडधंदे या माध्यमातून नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकते. यादृष्टीने कौशल्यावर आधारित व्यवसाय व शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना दिल्यास त्यातून मोठा रोजगार निर्माण होऊ शकतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल. वैनगंगा नदी या जिल्ह्याला लाभली असून वैनगंगेचा किनारा असलेल्या गावांमध्ये भाजीपाला क्लस्टर निर्माण केल्यास गावकऱ्यांचा व शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होईल. यासोबतच डेअरी फार्मिंग, गोटफार्मिंग व दुग्धव्यवसाय असा जोडधंद केल्यास शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात या दिशेने काम करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. जलयुक्त शिवार हा शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येईल, असे सांगितले. जलयुक्त शिवारची कामे पूर्ण होतील तेव्हा जिल्ह्याच्या पाणी पातळीत निश्चित वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मुलांमुलींना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी उपाय योजना आखल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. सोबतच शासनाच्या योजना प्राधान्याने राबवून विकासासाठी प्रयत्नशिल राहू, असेही त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
शेतीपूरक व्यवसाय, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य
By admin | Published: July 16, 2016 12:36 AM