युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कृषी विभाग मोहाडीच्यावतीने दुरुस्ती करण्यात आलेल्या बोरगाव-पालोरा रस्त्या लगतच्या नाल्यावर कृषी बंधाऱ्यास पहिल्याच वर्षी मोठे भगदाड पडले आहे. यामुळे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.तत्कालीन राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या पसंतीची योजना म्हणूनही सदर योजना ओळखली जायची. या योजनेंतर्गत मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात बोरगाव- पालोरा रस्त्यालगतच्या नाल्यावर सन २०१८-१९ मध्ये दुरुस्तीची काम करण्यात आले. या कामावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला. त्या अगोदार नाल्याचे खोदकाम करण्यात आले. नाल्यातील गाळाचे खोदकाम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक होऊन शेतीला सिंचन व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होईल, हा उद्देश त्यामागे होता. मात्र, जलयुक्तचे कामे करताना कंत्राटदारानी नाल्यातून जेसीबीने खोदलेली माती नाल्याबाहेर न टाकता अगदी नाल्याच्या काठावर टाकली. मातीला काठाच्या समांतर पसरविण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात नाले अर्धेअधिक बुजले. पाणी साठवण क्षमता घटली आहे. नाल्याकाठावर असलेल्या पडीत जमीन शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नाल्याच्या काठावरुन शेतकऱ्यांना आवागमन करण्यास समस्येचा सामना करावा लागत आहे.बोरगाव नाल्यावर पाण्याची साठवणुक क्षमतेनुसार व्हावी, या उद्देशाने लाखोंचा निधी खर्च करुन कृषी विभागांतर्गत नाल्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतू कामाची गुणवत्ता व्यवस्थीत न राखल्या गेल्याने पहिल्याच पावसात बंधाºयाला भगदाड पडले आहे. बंधाºयाचे दगड बाहेर पडून खोलगट भाग तयार झाला आहे. बंधारा दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बंधाऱ्याच्या पाहणीसाठी त्या भागातील कृषी सहाय्यकाला त्वरित पाठविले जाईल. चौकशीअंती एखाद्या योजनेत सदर बांधकाम प्रस्तावित करुन दुरुस्ती केली जाईल.- विजय रामटेके,तालुका कृषी अधिकारी मोहाडी.