मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दिवाळीच्या आनंदीमय सोहळ्यात बँकांना सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने गोरगरिबांसह शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी व्यवहारासाठी अडचणीत आले. तरुणाई मात्र ऑनलाईन व्यवहार करीत दिवाळीची खरेदी करीत आहे. सुशिक्षित एटीएममधून पैसे काढून दिवाळीचा आनंद साजरा करीत आहेत. सर्वसामान्यांचे व्यवहार ठप्प पडले आहेत.दिवाळीचा सण उत्साही वातावरणात सगळीकडेच साजरा होत आहे. शहरात दररोजच खरेदीचा मुहूर्त असतो; मात्र ग्रामीण भागात वेळेवर येणाऱ्या पैशातून खरेदीचा मुहूर्त साधला जातो. कर्जमुक्ती प्रोत्साहन निधीची रक्कम गुरुवारी रात्रीपर्यंत जमा झाली. शुक्रवारी बँकेत तोबा गर्दी तयार झाली. रोखीचा सुद्धा तुटवडा भासला. त्यामुळे बऱ्याच खातेदारांना व शेतकरी लाभार्थ्यांना पैशाची उचल करता आली नाही.संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे पैसे शुक्रवारी दुपारनंतर ऑनलाईन पद्धतीने खात्यात जमा झाले, असे तहसीलदार महेश शितोळे यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांना वेळेत माहिती झाली नाही. त्यामुळे पुढच्या तीन दिवसांच्या सुट्ट्यांनी गोरगरिबांची दिवाळी निराशेचीच ठरली. शासनाने व प्रशासनाने बँकिंग सुट्ट्यांचा अंदाज घेऊन पाच दिवसांपूर्वी आर्थिक नियोजन व्यवस्थित केले असते तर निश्चितच सर्वांची दिवाळी गोड झाली असती. मात्र आता वेळेवर खात्यात पैसे जमा झाल्याने धावपळ करावी लागत आहे.
मंगळवारी होणार तुफान गर्दी - २२ ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार त्यामुळे बंद, २३ ऑक्टोंबरला रविवार नियोजित सुट्टी व सोमवारला लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शासकीय सुट्टी आली. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद आहेत. तीन दिवसांच्या सुट्ट्यानंतर २५ ऑक्टोबर बँक उघडणार. त्यामुळे बँकेत ग्राहकांची एकच गर्दी होणार आहे. शिक्षकांचे पगार, निराधारांचे मानधन, शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी व नियमितचे व्यवहारासाठी ग्राहकांची एकच झुंबड राहणार आहे.
रोखीची समस्या राहणार?एकाचवेळी खातेदारांना निधीची व्यवस्था करताना बँकांना जिकिरीचे होणार असल्याची शक्यता दाट आहे. एटीएमवर ग्राहकांची गर्दी वाढलेली आहे. तर काही व्यवहार एकमेकांकडून तात्पुरत्या स्वरूपात उसनवार घेत तात्पुरती गरज भागवली जात आहे.