संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत गृहमंत्री, रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट कोंढा (कोसरा) : सर्वांचाच पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसारखी माझीही विमानात बसण्याची उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत भव्यदिव्य विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आचल जांभुळकर या विद्यार्थिनीने दिली.लोकमत समूहातर्फे ‘संस्काराचे मोती’ या स्पर्धेतील विजेत्या चिमुकल्यांना नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करविण्यात आली. यात सहभागी होऊन परतल्यानंतर आचल जांभुळकर या विद्यार्थिनीने प्रवासाचे वर्णन कथन केले. सोमवारला ती परत आल्यानंतर तिचा कोंढा येथील गांधी विद्यालयात लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालयप्रमुख मोहन धवड, वितरण प्रतिनिधी विजय बन्सोड, कोंढा येथील वार्ताहर चरणदास बावणे,नागपूर विभागातील संस्काराचे मोती या स्पर्धेतील विजेते शुक्रवारी सकाळी ७ वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीला विमान प्रवासाला निघाले. सर्वांचाच हा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. प्रथम हवाई प्रवास असतानासुध्दा उत्साहामुळे कोणाच्याही मनात भीती जाणवत नव्हती. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्यदिव्य रूप पाहून सर्वच विद्यार्थी भारावून गेले. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची एकत्र भेट झाली. येथे ४५ विद्यार्थी एकत्र आले त्यानंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी भारतीय रेल्वेच्या म्युझियमला भेट दिली. तेथे त्यांना भारतीय रेल्वेच्या प्रारंभापासून वर्तमानापर्यंत रेल्वेने केलेल्या प्रगतीची माहिती मिळाली. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पाचीही माहिती देण्यात आली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, आॅस्ट्रेलिया व वेस्ट इंडीज दुतावासला भेट यावेळी विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी स्मृती भवनाला भेट दिली. याप्रसंगाने सर्व विद्यार्थी भारावून गेले. प्रवासात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची त्यांच्या निवासस्थानी व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झालेली नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला ‘लोकमत’ समूहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ‘लोकमत’च्या या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सर्व विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात पार्कर पेन दिले. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया आचल जांभुळकर या विद्यार्थिनीने दिली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरच्या आकाशात घिरट्या घालू लागले. खराब हवामानामुळे विमान लँड होऊ शकले नाही. नाईलाजास्तव विमान हैद्राबाद विमानतळावर आले व एक तासाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा नागपूरच्या दिशेने उड्डाण करीत सुखरूप पोहोचले, असे आचलने सांगितले. लोकमत समूहातर्फे आचलला मिळालेल्या दिल्ली हवाई सफरीमुळे कुटुंबामध्ये आनंद व्यक्त होत आहे लोकमतच्या उपक्रमामुळे त्याला अभूतपूर्व प्रवास करण्याची संधी मिळाली, असे उदगार आचलच्या कुटुंबीयांनी काढले. (वार्ताहर)
विमान प्रवासाने भारावलो
By admin | Published: June 28, 2016 12:34 AM