स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : शहरातील म्हाडा वसाहतीत होता अड्डा लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शहरातील प्रसिद्ध म्हाडा वसाहतीत मागील आठ वर्षांपासून सुरू असलेल्या एका देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला. या कारवाईत देहव्यापर चालविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक केली. यात देह विक्री करणाऱ्या नागपूरच्या दोन महिलांचा समावेश आहे. एकाच आठवड्यातील ही दुसरी कारवाई असून ती मध्यरात्री करण्यात आली. निशा (४३) रा. रजनीनगर खात रोड भंडारा ही देहव्यापार करणारी महिला असून अटक करण्यात आलेल्या पुरूषांमध्ये महेंद्र जागनाडे (२९), शुभम रामदास शेंडे (२१), रूपेश राजूजी राऊत (२२) सर्व रा. लावेश्वर ता. भंडारा यांचा समोवश आहे. तर देह विक्री करणाऱ्या दोन्ही महिला या नागपूरच्या असून त्या ३० वर्षांच्या आतील आहेत. त्यातील एक विवाहित तर दुसरी अविवाहित आहे. भंडारा शहरातील खात रोडवरील म्हाडा वसाहतीत एक घर भाड्याने घेऊन निशा ही महिला या व्यवसायात मध्यस्थीची भूमिका निभविणाऱ्या एका इसमासह या घरी राहत होती. या दोघांनी मागील आठ वर्षांपासून या उच्चभू्र वसाहतीत देहव्यापार सुरू केला होता. परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. नागरिकांनी तक्रार दिली होती. निशा हा व्यवसाय करण्यासाठी दरवेळी जागा बदलत असल्याने पोलिसांना कारवाईत यश आले नाही. दरम्यान प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घरी आज मध्यरात्री छापा घालून ही कारवाई केली. या कारवाईत व्यापार करणाऱ्या महिलेस देहविक्री करणाऱ्या नागपूरच्या दोन महिला व इसमांना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात पोलीस कर्मचारी अरूण झंझाड, रेहपाडे, रोशन गजभिये, बबन अतकरी, कौशिक गजभिये, रमाकांत बोंद्रे, स्रेहल गजभिये, योगिता जांगळे यांचा समावेश होता. दोन महिन्यांपासून मागावर म्हाडा वसाहतीत ही महिला देहव्यापार करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून सदर पथक मागील दोन महिन्यांपासून महिलेच्या मागावर होते. मात्र, ती हा व्यापार करण्याकरिता वेळोवेळी अड्डा बदलवित असल्याने कारवाईस विलंब लागला. शनिवारला रात्री मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सुरूवातीला या घरी एक ‘फंटर’ पाठवून खातरजमा केली. त्यानंतर छापा घालण्यात आला. छापा पडताच घरातील सर्व आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. यात चार आरोपींचे चार मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहे. आठवड्यातील दुसरी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारला बेला येथील एका देहव्यापार अड्ड्यावर छापा घातला होता. या कारवाईत देहव्यापार करणारी एका महिला, देहविक्री करणारी महिला व पुरूष अशा तिघांना अटक केली होती. या कारवाईनंतर आठवड्याभरातच ही दुसरी कारवाई असल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे.
देहव्यापार अड्डयावर धाड
By admin | Published: June 19, 2017 12:25 AM