लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दारूचे व्यसन कसे संसार उद्ध्वस्त करतात याचा पदोपदी अनुभव येतो. दारूचे व्यसन असलेल्या कुटुंबाचे सुख समाधान कसे हिरावले जाते, याची उदाहरणे आसपास पाहायला मिळतात. अशाच दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाची राखरांगोळी झाली. पत्नीने किरकोळ वादात पेटवून घेतले. तिला वाचविताना पतीही जळाला आणि क्षणात दोघांचाही जळून मृत्यू झाला. तीन वर्षाचा चिमुकला पोरका झाला. भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले.भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथील महेंद्र मिताराम शिंगाडे आणि पहेला येथील मेघा यांचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला. सुरुवातीला सुखाचा संसार सुरू होता. या दांपत्याच्या संसारवेलीवर एक गोंडस फूलही जन्माला आले. घरात कोडकौतुक सुरू होते. अशातच संगणक ऑपरेटर असलेल्या महेंद्रला दारूचे व्यसन लागले. त्यातून आर्थिक चणचण जाणवू लागली. घरात वाद होऊ लागले. व्यसनासाठी महेंद्रने अनेकांकडून उसनवार पैसे घेतले होते. तेच पैसे मागण्यासाठी काही जण घरी येत होते. परंतु मेघाला हा प्रकार पसंत नव्हता. तिने याबाबत त्याला वारंवार सांगितलेही. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शनिवारीही याच कारणावरून महेंद्र आणि मेघा यांच्यात वाद झाला. वादात रागाच्या भरात मेघाने अंगावर राॅकेल ओतून घेतले. पत्नी पेटत असल्याचे पाहून महेंद्र तिच्या मदतीला धावला. मात्र दोघांचाही काही क्षणातच जळून मृत्यू झाला. दारूच्या व्यसनाने एका कुटुंबाची राखरांगोळी झाली. भिलेवाडा गावासह जिल्ह्यात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
तीन वर्षाचा रिहान झाला पोरका- आजी-आजोबांचा लाडका असलेला रिहान आई-वडिलांच्या मृत्यूने आता पोरका झाला आहे. रिहानचा जन्म झाला तेव्हा घरात काय कोडकौतुक होते. प्रत्येकाच्या लाडाचा रिहान होता. मात्र वडिलांच्या दारुच्या व्यसनाने एका तीन वर्षाच्या चिमुकल्यावर आता पोरका होण्याची वेळ आली आहे.
मेघा दारात तर महेंद्र घरातच कोसळला- मिताराम शिंगाडे यांना महेंद्र आणि विवेकानंद ही दोन मुले आहेत. दोघेही भाऊ एकाच घरात वेगवेगळे राहत होते. तेथेच आईवडीलही राहत होते. शनिवारी रात्री भाऊ विवेकानंद आणि त्याची पत्नी अलका जेवणानंतर बाहेर फिरायला गेले. त्यावेळी या दोघांचा वाद सुरू होता. दरवाजाही उघडा होता. परत आले तेव्हा दार बंद दिसले आणि घरातही शांतता दिसत होती. मात्र काही वेळातच आरडाओरडा झाला. जळालेल्या अवस्थेत मेघा दाराच्या बाहेर कोसळली तर महेंद्र घरातच कोसळला. या दोघांना विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्वकाही संपले होते. यावेळी घरातील मंडळींचा आक्रोश मन हेलावुन टाकणारा होता.
खाकी वर्दीही हळहळली - पती-पत्नीने पेटवून घेतल्याची माहिती कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांना घटनेनंतर अवघ्या काही वेळातच मोबाइलवर मिळाली. तत्काळ ते आणि पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मिसळे ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथील शिंगाडे कुटुंबाच्या घरी गेले. दारात जळलेल्या अवस्थेत पडून असलेली मेघा आणि घरात मृत्युमुखी पडलेला महेंद्र हे दृष्य पाहून पोलीसही क्षणभर अवाक झाले. तीन वर्षाच्या चिमुकल्याचा आक्रोश पाहून खाकी वर्दीही हळहळली. काय दोष या चिमुकल्याचा, असेच पोलीस म्हणत होते.