नाना पटोले : जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक भंडारा : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्य उपयोग करावा. यासोबतच कुठल्याही विभागाचा निधी परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना खासदार नानाभाऊ पटोले यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना २०१५-१६ च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. सवर्साधारण योजनेकरीता १०१ कोटी ६६ लाख २१ हजार तरतूद अर्थकल्पित करण्यात आली होती. यंत्रणेकडून मार्च २०१६ अखेर १०१ कोटी २९ लाख ५७ हजार रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला असून खर्चाची टक्केवारी ९९.६४ टक्के आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ३९ कोटी ४७ लाख एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून शासनाकडून ३७ कोटी ६३ लाख ५ हजार रुपये प्राप्त झाले. संपूर्ण निधी कार्यवाही यंत्रणेस वितरित करण्यात आलेला असून यंत्रणेकडून मार्च २०१६ अखेर ३६ कोटी ६६ लाख ५१ हजार एवढा निधी खर्च करण्यात आला. खर्चाची टक्केवारी ९७.४३ टक्के आहे. आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र योजना अंतर्गत १२ कोटी ८४ लाख ४० हजार एवढा निधी अर्थसंकल्पित होता. त्यापैकी शासनाकडून १२ कोटी २५ लाख ९१ हजार निधी प्राप्त झाला. मार्च 2016 अखेर ११ कोटी ८६ लाख ९७ हजार एवढा निधी खर्च झाला असून खर्चाची टक्केवारी ९६.८२ टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ साठी सवर्साधारण योजना ९९ कोटी ६८ लाख, अनुसूचित जाती उपयोजना ४३ कोटी ७१ लाख व आदिवासी उपयोजना बाहयक्षेत्र योजना १३ कोटी ६३ लाख ४३ हजार एवढा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या नियतव्ययाचे नियोजन आजच्या बैठकीत ठेवण्यात आले. या बैठकीत वन विभागाचे पट्टे वाटप, जिल्हा परिषदचे ग्रामीण रस्ते, पथदिवे, व्यायामशाळांचा विकास, शाळांच्या वर्ग खोल्या, सामूहिक विवाह योजना, नावीन्यपूर्ण योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, कर्ज पुर्नगठन, यात्रास्थळ विकास, पिक विमा योजना, पशुसंवर्धन व जलयुक्त शिवार यासह विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार व अॅड. रामचंद्र अवसरे यांनी विविध प्रश्न व समस्या या बैठकीत मांडल्या. जिल्हा नियोजन मधून विकास कामे करतांना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार कामे करावी, असे आमदारानी सूचविले. या बैठकीस सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
जिल्हा वार्षिक योजनेचे सर्व विभागांनी योग्य नियोजन करावे
By admin | Published: June 27, 2016 12:33 AM