बेरोजगारीमुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या काळात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण ५६० बालविवाह रोखण्यात महिला व बाल विकास विभागाला यश आले असून, भंडारा जिल्ह्यात प्रतिबंध करण्यात आलेल्या ९ बालविवाहांचा त्यात समावेश आहे. तसेच ग्रामस्तरावर ग्रामसेवक यांना बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविका बालविवाह प्रतिबंधात्मक अधिकाऱ्यास साहाय्य करतील. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध करण्याकरिता सर्व यंत्रणांना आदेश निर्गमित करण्यात आले असून बालविवाहसंदर्भातील प्रकरणाच्या माहिती व मदतीकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी व बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष भंडारा नितीनकुमार साठवणे यांची मदत घेण्यात यावी. बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलगी व २१ वर्षांखालील मुलगा यांचा विवाह करणे व त्यासाठी सहकार्य करणे हा दखलपात्र गुन्हा असून त्यामध्ये कारावास व एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. बालविवाह करणाऱ्या मंडळींसोबतच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी, मंडप डेकोरेटर, लग्नविधी पार पाडणारे, पत्रिका छपाई करणारे प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर व इतर संबंधित असणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येते. जिल्ह्यात बालकांच्या मदतीकरिता जिल्हा बाल संरक्षण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रीडा संकुल भंडारा येथे संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव उघड केले जाणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी कळविले आहे.
बालविवाह रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेसह सर्व विभाग झाले सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:36 AM