लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भासह राज्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असून, जिल्ह्यातही गत तीन दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. काेराेना संसर्गाचा प्रसार राेखण्यासाठी महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यात आयाेजित सर्व यात्रा जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये रद्द केल्या आहे. गायमुख, झिरी, भातहांडी यासह कुठेही महाशिवरात्रीची यात्रा भरणार नाही. महाशिवरात्री ११ मार्च राेजी आयाेजित आहे. जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवसांची यात्रा भरविली जाते. या यात्रेत दरवर्षी एक ते दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात. तसेच बाहेरील राज्यातूनभाविकांचे पाेहे नवस फेडण्यासाठी मुक्कामी येतात. त्यामुळे येथे माेठी गर्दी असते. गत वर्षभरापासून काेराेना ससंर्ग सुरू आहे. अलीकडे भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्यात काेराेना रुग्ण वाढत असल्याने खबरदारीच्या उपाययाेजना म्हणून जिल्ह्यातील महाशिवरात्रीनिमित्त भरविण्यात येणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यामध्ये फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन हाेण्यास अडसर हाेऊन काेराेना संसर्ग हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वसामान्य जनतेस त्यांच्या आराेगयास हानी पाेहोचू शकते त्याआनुषंगाने यात्रा भरविणे उचित हाेणार नाही, असे जिल्हा पाेलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले.
त्यावरुन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांन्वये जिल्ह्यातील महाशिवरात्रीच्या यात्रा रद्द करण्याचे आदेश निर्गमित केले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या यात्रा झाल्या रद्द
तुमसर तालुक्यातील गायमुखसह झिरी, भातहांडी, नेरला, काेरंभी, चुलबंदनदीघाट, गडकुंभली, तुमडापूरी, वटटेकर, शिवनीटाेला, वलमाझरी, भंडारा, हत्तीडाेई, चंद्रपूर, मुरली, गाेबरवाही, भुटेरा, राजापूर, खुणारी, किटाळी, गराडा, बुढरी, माेघरा (शिवनी) या यात्रांचा समावेश आहे.