ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामपंचायत निवडणूक आटोपताच आता जिल्ह्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. युती-आघाडी करायचीच असेल, तर ती निवडणुकीनंतर करा, अशी भूमिका कार्यकर्त्यांची आहे, तर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.कोरोना महामारीमुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहेत. आता कोरोना महामारीचे संकटही कमी झाले आहे. जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यामुळे आता लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. भंडारा जिल्हा परिषदेत ५२ गट आणि ७ पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गत काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, युती-आघाडी होणार की, स्वतंत्र लढावे लागणार याबाबत कोणताच निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला नाही. त्यामुळे प्रत्येकच पक्षाने जिल्हा परिषदांच्या सर्वच ५२ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, अशी आघाडी होऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र, स्थानिक कार्यकर्ते युती- आघाडी करा; परंतु ती निवडणुकीनंतर, अशी आग्रही भूमिका घेत आहेत. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी चालविली आहे. राष्ट्रवादीनेही स्वतंत्र लढण्याचीच मानसिकता केली आहे. शिवसेना तर पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरू आणि भाजपला जागा दाखवू, असे सांगत आहे, तर भाजप सध्या राज्यात विरोधी पक्षात असल्याने स्वतंत्र निवडणूक लढवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या तयारीत आहे. अनेकांनी निवडणुकीची जोरदार तयारी चालविली असून जनसंपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली जात आहे. अनेक ठिकाणी शुभेच्छा फलकही लावले आहेत.
मतांचे विभाजन टाळण्यासाठी एकत्र लढणे गरजेचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्वतंत्र लढले, तर मत विभाजनाचा फायदा भाजपला मिळेल, अशी काही जणांची भावना आहे. या तीन पक्षांनी गत विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात एकत्र येऊन निवडणूक लढली आणि भाजपचा गड असलेला मतदारसंघ काँग्रेसने आपल्याकडे खेचून आणला. असाच प्रयोग जिल्हा परिषदेत करावा, अशी भूमिका आहे, तर दुसरीकडे तीन पक्ष एकत्र लढल्यास स्थानिक पातळीवर बंडखोरी होऊन विरोधकांना त्याचा फायदा होईल, अशीही चर्चा आहे.
स्थानिक आघाड्या उतरणार मैदानात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत चार प्रमुख पक्षांसह इतर पक्ष आणि स्थानिक आघाड्याही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. इतर गटही आघाड्या स्थापन करून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत, तसेच वेळेवर तिकीट न मिळालेले अनेक बंडखोरही रिंगणात राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्र लढण्याचे नियोजन केले आहे. कार्यकर्त्यांची तशीच भावना आहे; परंतु आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल योग्य निर्णय घेतील. वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल.-नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी
जिल्हा परिषदेची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार आहे. कार्यकर्त्यांची हीच भावना आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु असून इच्छुकांची यादी तयार केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या ५२ जागा भाजप लढविणारच.-शिवराम गिऱ्हेपुंजे, जिल्हाध्यक्ष भाजप
काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वतंत्र आणि स्वबळावर निवडणूक लढण्याची आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जाईल; परंतु निवडणुकीनंतर युती करावी, अशी सर्वांची भूमिका आहे. पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्वाचा राहिल.-मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढणार आहे. आम्हाला भाजपला या निवडणुकीत जागा दाखवायची आहे. भाजप सोडून कुणाशीही आम्ही आघाडी करू शकतो, तसेच वरिष्ठ जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन केले जाईल.-ॲड. रवी वाढई, जिल्हा शिवसेनाप्रमुख