माधवी खोडे यांचे आवाहन : विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभभंडारा : आदिवासी विद्यार्थ्यांना शारिरिक क्षमतेचे वरदान लाभले आहे. या क्षमतेला शिस्त, समर्पण, निर्धार, सहनशीलता, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन यांची जोड दिल्यास खेळाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी आपले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवू शकतात, असे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुलात आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, प्रकल्पस्तरीय नियोजन समितीचे अध्यक्ष बिसन सयाम, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार, शिक्षणाधिकारी के. झेड. शेंडे उपस्थित होते. यावेळी अतिथींच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. क्रीडा स्पर्धेमध्ये देवरी, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, गडचिरोली आणि भंडारा चमुच्या खेळाडुंनी पथसंचलन करुन मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते दौड स्पर्धेची फीत कापून दौड स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.खोडे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमतेसोबतच मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे. यातुन जिंकणाऱ्या खेळाडूंसाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागपूरला विशेष प्रशिक्षणाची व्यवस्था करुन देण्यात येणार आहे. चमू जिंकण्यासाठी खेळाडुवृत्ती ठेवा. नागपूर विभागातील चमूने आॅलिम्पिक स्पर्धेतही चमकावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्रीडा गुण असल्यामुळेच २,३३० खेळाडू सहभागी झाले आहेत. आदिवासी समाजाची विजयी पताका हे विद्यार्थी कायम फडकावत राहतील. राज्यघटनेत आदिवासींसाठी विशेष तरतूद केली आहे. त्याचा लाभ घेऊन आदिवासी बांधवांनी विकासाच्या प्रक्रियेत यावे, असे आवाहन केले.यावेळी बिसन सयाम म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील शारीरिक क्षमतांचा उपयोग केल्यास आदिवासी समाज देशात लौकिक निर्माण करेल. विद्यार्थ्यांनी खेळाडुवृत्ती जोपासून खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करावे. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप झळके मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गडचिरोली आणि देवरी येथील खेळाडूंनी आदिवासी नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. तीन दिवसीय या क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या आठ प्रकल्पातील २,३३० खेळाडु सहभागी झाले आहेत. यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धाव स्पर्धा आदी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यावेळी अहेरी, भामरागडचे प्रकल्प अधिकारी सोनकवळे, चंद्रपूरचे वानखेडे, चिमूरचे चौधरी, गडचिरोलीचे राचलवार, देवरीचे रघुते व क्रिडा प्रशिक्षक, क्रीडा परिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
क्रीडा स्पर्धेतून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवा
By admin | Published: December 02, 2015 12:31 AM