देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून इतर आजारांच्या शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, तुमसर व साकाेली येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या. परंतु, इतर शस्त्रक्रियांकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यांना तारीख पे तारीख दिली जात होती. परंतु, आता भंडारा जिल्ह्यात कोराेनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे इतर आजारांसाठी ही आरोग्य सेवा पूर्वपदावर आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांनी उपचार घेतला आहे. इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यास वेग आला आहे. कोरोनाच्या काळात दररोज ओपीडी ही २०० होती. परंतु, आजघडीला नेहमीप्रमाणे रुग्णसंख्या वाढत असून, ओपीडीची संख्या पाहता ५०० च्या घरात रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
कोणत्या रुग्णालयात कोणत्या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय : सर्व प्रकारच्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे.उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येतात. काही शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता सर्वच शस्त्रक्रिया होत आहेत.
वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली
अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. शस्त्रक्रिया करण्याचा आता मुहूर्त निघाला. अनेक दिवसांपासून पोटाची शस्त्रक्रिया करायची होती. परंतु, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल केले जात नव्हते. त्यामुळे माझी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. डॉक्टरांनी आता तारीख दिली. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी मी रुग्णालयात दाखल झालो आहे.महेश दुताेंडे, रुग्ण
गर्भाशय काढायचे असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले आहे. कोरोनाच्या वेळेस अनेकदा रुग्णालयात आल्यावरही डॉक्टरांनी परत पाठविले होते. परंतु, कोरोनाचा प्रभाव कमी होताच डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहे.- सरिता वाघमारे, रुग्ण
रुग्णालय ओपीडीत होऊ लागली गर्दी भंडारा जिल्ह्यात एकमेव असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय दाेन उपजिल्हा रुग्णालय ३३ प्राथमिक आराेग्य केंद्र व सात ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला असता रुग्ण तपासणी नियमित हाेत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तर ५०० च्या घरात रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होत आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. त्यासाठी कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या अटी व नियमांचे पालन करून रुग्णांनी उपचार घ्यावा.- डॉ. रियाज फारुखी, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.
गोरगरिबांवर कोरोना काळात उपचार झालेच नाही
- भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय तुमसर व साकाेली येथील रुग्णालयात कोरोनाच्या काळात फक्त कोरोनाच्याच रुग्णांवर उपचार करण्यात आली व गर्भवतीची प्रसूती करण्यात आली. याशिवाय इतर कुठल्याही आजारावर उपचार करण्यात आले नाही. त्यामुळे गोरगरिबांनाही खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागले. त्यात खासगी रुग्णालय चालकांकडून मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करण्यात आली.