भंडारा : जंगलात गस्त सुरू हाेती. एका तलावाच्या काठी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत थांबले हाेते. तेवढ्यात एक काळ्या तपकिरी रंगाचे फुलपाखरू उडत आले. काही कळायच्या आत माझ्या हातावर येऊन बसले. हातावर हळूवार चालू लागला ताे क्षण मला आनंददायी वाटला आणि तेथूनच सुरू झाला काेका अभयारण्यात फुलपाखरे शाेधण्याचा छंद, असे काेका वन्यजीव अभयारण्यातील व्याघ्र संरक्षण दलाच्या वननिरीक्षक नूतन चंद्रशेखर उईके सांगत हाेत्या.
व्याघ्र संरक्षण दलात काम करताना त्यांना फुलपाखरे निरीक्षणाचा लागलेला छंद आज काेका अभयारण्यातील वेगळे विश्व उलगडून दाखवत आहे. नियमित काम करताना नाजूक इवल्याशा फुलपाखराकडे त्यांची नजर असते. संग्रहित केलेल्या फुलपाखरांची माहिती जैवविविधतेत भर घालणारी आहे.
आपल्या सहकाऱ्यांसाेबत व्याघ्र संरक्षणात त्या अतिशय दक्ष असतात. जंगल आणि वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे हा त्यांचा नाेकरीचा भाग असला, तरी त्यांनी जाेपासलेला छंद आज काेका अभयारण्याचे वैभव सर्वांसमाेर आले आहे.
फुलपाखरांचा हजाराेंचा थवा
एक दिवस जंगलात आश्चर्यकारक दृश्य दिसले. जंगलात पर्यटन रस्त्याने गस्त सुरू हाेती. समाेर चालत असताना हजाराे फुलपाखरांचा थवा उडत हाेता. हा थवा पाहताच मी स्तब्ध झालाे. ते दृश्य पाहतच राहिली. त्याक्षणी असे वाटले, रानातील सगळी फुलपाखरे एकत्र तर आली नाही ना ! ते नेमके काय कुजबुज करीत आहेत याचा अंदाज घेत हाेते. त्यांच्या जवळ गेले तरी कुणाला काही भान नव्हते, ते आपल्या दुनियेत हाेते. हे दृश्य माझ्या जीवनातील अविस्मरणी आहे असे अनुभव नूतन उईके सांगत हाेते.
जंगलातच गाव अन् जंगलातच नाेकरी
भंडारा तालुक्यातील सालेहेटी हे गाव नूतन उईके यांचे गाव. गावाच्या चारही बाजूला घनदाट जंगल. जंगलातील शाळेतच शिक्षण आणि जंगलातच नाेकरी आहे. जंगल बालपणापासून पाहत आले. जंगलाबद्दल नेहमी आकर्षण हाेते. २६ मे २०१६ राेजी वनविभागात रुजू झाले. जंगलातच गाव, आता नाेकरीही जंगलात मिळाल्याने एक वेगळा आनंद आहे, असे त्या सांगतात.
नूतन उईके म्हणतात...
भूतलावावरून वाघाचा नाश म्हणजे जंगलाचा अंत, वृक्षांची कत्तल म्हणजे माणुसकीचा अंत, मानवी हस्तक्षेप म्हणजे सजिवांचा अंत, मधमाश्यांचा शेवट जीवसृष्टीचा अंत आणि फुलपाखरांचा नायनाट म्हणजे मानवाचा तारुण्याचा अंत... असे त्या सांगतात. प्रत्येकाने जीवसृष्टीच्या संवर्धनासाठी पुढे यावे, असे त्या म्हणतात.