भंडारा : वर्षभरापासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यातच घरपोच सिलिंडर देण्यामागे प्रति सिलिंडर १० ते २० रुपयांपर्यंत मागितले जात आहे. ग्रामीण भागात हा दर थोडा फार अधिक असल्याचेही सांगण्यात येत आहेत. आधीच सिलिंडरचे दर वाढले असताना घरपोच सेवेसाठी वेगळी लूट कशाला, असा सवालही ग्राहक विचारत आहेत.
सद्य:स्थितीत घरगुती गॅस सिलिंडर ९४६ या दराने मिळत आहेत. गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायचा काय, असा सवालही गृहिणी विचारत आहेत. त्यातच घरपोच सिलिंडर उपलब्ध करून देणाऱ्याकडून २० किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मागितले जाते. आधीच सिलिंडरचे दर वाढले असताना ही वेगळी लूट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे सबसिडीही घटली आहे, वर्षभरात गॅस सिलिंडरच्या दरात ४७० पेक्षा जास्त रुपयांनी दरवाढ झाली आहे.
बॉक्स
वर्षभरात ४७० रुपयांची वाढ
गत वर्षभराच्या गॅस सिलिंडरच्या दराबाबत अवलोकन केले असता ४७० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे गरिबांचे बजेट तर अधिकच बिघडले आहे. यासंदर्भात विचारणा केली असता हे दर परवडण्यासारखे नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
बॉक्स
डिलिव्हरी बॉयला वेगळे वीस रुपये कशासाठी?
ग्राहक घरबसल्याच मोबाइलच्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुकिंग करीत असतात घरपोच सिलिंडर आल्यानंतर कोणी दहा रुपये तर कुणी १५, तर कुणी वीस रुपये देत असतात. डिलिव्हरी बॉयसुद्धा पैशाची मागणी करीत असतात. कोणी स्वखुशीने तर कोणी नाइलाजास्तव पैसे देत असल्याचे सांगतात. मात्र, हे वेगळे पैसे कशाला, असा सवालही आता उपस्थित होत आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरासोबतच व्यावसायिक सिलिंडरसुद्धा महागले आहेत. व्यावसायिक सिलिंडर सध्या ७० रुपयांनी महागला असून त्याची किंमत आता १८६७ रुपये झाली आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडर व नंतर व्यापारी सिलिंडरच्या दरवाढीमुळे ग्राहक चांगले त्रस्त झाले आहेत. त्यांच्यामध्ये रोष दिसून येत आहे.