१४ लोक ०१ के
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. मात्र, तालुक्यातील एका प्रगतशील सधन शेतकऱ्याने या सर्वांना जोड देत ‘आम्र महोत्सव’ साजरा करुन अक्षय तृतीयेचा सण साजरा केला.
लाखांदूर येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कुथे पाटील व कुटुंबियांनी अक्षय तृतीयेला आम्र महोत्सव साजरा केला. सुरेश कुथे पाटील हे ग्रामविस्तार अधिकारी होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी लाखांदूर येथील गांधी चौक येथे मल्हार फार्म्स पशु भांडारची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना वृक्ष लागवडीची आवड होती. स्वमालकीच्या जवळपास १८ एकर शेतातील बांधावर फणस, विविध जातीचे आंबे, सीताफळ व सागवान वृक्षाची लागवड केली. तर शेतात धान व कडधान्याचे उत्पादनदेखील घेतले. शेतात हळद लागवड व जवळपास दीड एकर शेतात माशाचे उत्पन्न घेतले जाते. त्यांच्या शेतात लंगडा, दशहरी, गावठी, मलगोबा, बैगनपल्ली अशा विविध प्रकारच्या आंब्याच्या झाडांची बागच आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आदर्श ठरावा, अशा कुथे पाटील यांनी स्वत:च्या शेतातील विविध आंबे तोडून घरी चक्क त्या फळांची तोरणमाळ लावत आम्र महोत्सव साजरा केला. बऱ्याचदा आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंना तिलांजली देत बाजारातून नवनवीन वस्तू खरेदी करत वेगवेगळे सण साजरे केले जातात. मात्र, कुथे पाटील यांनी शेतातीलच आम्रफळांना महत्त्व देत येणाऱ्या पिढीसमोर आदर्श ठेवत शेतातील पिकांना महत्त्व दिले.
कुथे पाटील त्यांच्या शेताच्या बांधावरील एका आम्रवृक्षापासून यंदा जवळपास २ ते ३ क्विंटल आंबे मिळाले असून, शेतातील सर्व आंब्यांच्या झाडाचे एकूण उत्पादन जवळपास ५० ते ६० क्विंटल निघाले आहे. त्यांनी तालुक्यात विक्रमी उत्पादन घेतले आहे. लाखांदूर व परिसरात कुथे पाटलांचे कार्य कौस्तुकापद ठरत आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लोक आपल्या पितरांच्या स्मरणार्थ मातीच्या कलशांची पूजा करून त्यावर हिंदू संस्कृतीनुसार आंबा फळ ठेवण्याची प्रथा आहे. परंतु, सुरेश कुथे पाटलांनी त्या प्रथेला फाटा देऊन आपल्या दुकानासमोर आम्रफळाचे तोरण बांधून ‘आम्र महोत्सव’ साजरा केला. त्यामुळे गावात व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.