सुखदेव गोंदोळे
खराशी : उन्हाळा आला की आठवण होते ती आंब्याची. हा आंबा म्हणजे एक्सोर्ट केलेला आंबा नव्हे तर गावरानी आंबा होय. मात्र, हा आंबा आता हद्दपार झाल्याचे चित्र आहे. गावकुसातील आमराई थोड्या पैशांच्या मोहात अनेकांनी तोडून टाकल्या. त्यामुळे गावरान आंबे दुर्मीळ झाले आहेत. पूर्वी उन्हाळ्यात खास रसाळीचा पाहुणचार व्हायचा. तोही आता बंद झाला आहे.
तीन दशकांपूर्वी कोणत्याही गावात शिरले की, सुरुवातीला शेतात आमराई दिसायची. गर्द हिरव्या रंगाच्या आम्रवृक्षाखाली दमून भागून आलेला व्यक्ती विश्रांती घ्यायचा. प्रत्येक शेतात एक दोन आंब्याचे झाडही दिसायचे. या आमराईमुळे गावातील घराघरांत आंबे असायचे. आजोबाने लावलेल्या आंब्याचे नातू रस खायचे. परंतु गावागावांत नामांकीत आंब्याच्या आमराया अस्तित्वात होत्या. वेगवेगळ्या चवीच्या आंब्यांमुळे ग्रामीण भागात चंगळ असायची. पाहुण्यांसाठी खास आमरसाचा पाहुणचार असायचा. जावईबापूंसाठी तर खास मेनूच असायचा.
काळाच्या ओघात मानवाने या गर्द आमराईवर कुऱ्हाड चालविली. गावागावांतील आमराया नष्ट झाल्या. बाजारात गावरान आंबे दिसेनासे झाले. त्यामुळे आंब्याची तरुणपिढीला चवही माहीत नाही. आज बाजारात कृत्रिमरित्या पिकविलेला आंबा येतो. परंतु गावरान आंब्याची चव त्याला येणार तरी कशी?
बाॅक्स
आंबा लागवडीला प्रोत्साहन हवे
गावागावांतील आमराया नष्ट झाल्याने गावरान आंबा आता कुठेच दिसत नाही; परंतु शासनाने आता पुढाकार घेऊन आंबा लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आंब्याची झाड लावणाऱ्या शेतकऱ्याला पाच वर्षातून एकदा सबसिडी द्यावी, त्यामुळे शेतकरी आंब्याचे जतन करील. गावरान आंब्याला फळ यायला बरीच वर्ष लागतात. त्यामुळे लवकर फळ येणाऱ्या गावरान आंब्याच्या जाती विकसीत कराव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.