भंडारा शहरालगत कारधा येथे वैनगंगेच्या तीरावर मांगगारुडी समाजाची वस्ती आहे. वर्षानुवर्षे ही मंडळी मिळेल ते काम करून येथे राहत आहेत. कोणताही पुराव्याचा कागद नसल्याने शासकीय प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे शासकीय योजनांचाही लाभ मिळत नव्हता. गत ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या वस्तीला भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर या वस्तीचे सर्वेक्षण करून यादी तयार केली. आवश्यक सर्व दाखले देण्यासाठी पुढाकार घेतला. शुक्रवारी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मनिषा कुरसुंगे, समाज कल्याण सहायक आयुक्त आशा कवाडे, तहसीलदार अक्षय पोयाम, तहसीलदार साहेबराव राठोड, गटविकास अधिकारी नूतन सावंत, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजय नंदागवळी, अग्रणी बँक व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांचा ताफा या वस्तीत पोहचला.
शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबिर लावून मतदान कार्ड, आधारकार्ड, घरगुती वीजमीटर जोडणी, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, बाल संगोपन योजना, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला, आरोग्य तपासणी आदी सर्व या शिबिरात तयार करून देण्यात आले. आधारकार्ड नसल्याने अनेक जण लाभापासून वंचित होते. या शिबिरात त्यांना तत्काळ आधारकार्डही तयार करून देण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्यावतीने १९ व्यक्तींना शून्य बॅलेन्सवर खाते उघडून देण्यात आले. ११ घरात विजेसाठी अर्ज करण्यात आले. तिघांच्या घरी तर तत्काळ वीज मीटर बसवून घरातील अंधार नव्हे वस्तीतील अंधार दूर केला.
यासोबतच नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ॲन्टिजेन तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. शंभर व्यक्तींची यावेळी तपासणी झाली. महाआवास योजनेंतर्गत २१ लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. कधी नव्हे ते प्रशासन थेट उपेक्षित वस्तीत पोहचले आणि आता मांगगारुडी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी असलेली अडचण दूर झाली.
बॉक्स
प्रशासन पोहचले उपेक्षितांच्या वस्तीत
एरवी एकेका प्रमाणपत्रासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याचा अनुभव प्रत्येकालाच आलेला असतो. मात्र शुक्रवारी चक्क प्रशासन उपेक्षितांच्या वस्तीत पोहचले. त्या ठिकाणी शिबिर लावून लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आता अशाच जिल्ह्यातील अनेक उपेक्षित वस्त्यांचाही कायापालट व्हावा एवढी अपेक्षा.
कोट
विधवा पेन्शन मिळत नसल्याने हाल होत होते. कुठे अर्ज करावा हेही माहीत नव्हते. आमच्याकडे कागदपत्रेही नव्हती. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यामुळे आमची कागदपत्रे तयार झाले. आता पेन्शन सुरू झाली. जिल्हाधिकाऱ्यांना माझे आशीर्वाद लागतील.
-बीनाबाई दुनाडे, मांगगारुडी वस्ती कारधा.