सर्व शिक्षा अभियानाचा उपक्रम : बालकांना वाटप केले पुस्तक, वह्या, बिस्किटेभंडारा : सर्व शिक्षा अभियानातील विषयसाधन व्यक्ती यांच्या शाळाबाह्य बालके शोध मोहिमेंतर्गत भंडारा शहरात झाडू विकण्याच्या कामासाठी येणाऱ्या पारधी समाजाच्या हंगामी झोपड्यातील ६ ते १४ वयोगटाीतल बालकांना लेखन - वाचन साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.छत्तीसगड राज्यातील लमहासमुंदर जिल्ह्यातील परसोंडा येथील काही पारधी कुटुंबे भंडारा येथे आॅफीसर्स क्लबच्या इमारतीजवळ अगदी राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक हंगामी झोपड्या थाटून काही दिवसांपासून झाडू विकण्याचे काम करत आहेत. सिंदीच्या झाडाच्या फंट्यापासून (झावळ्या) झाडू तयार करणे व विकणे यासाठी अख्खे कुटुंब राबत आहेत. त्यांच्यासोबत अगदी लहान छोटी बालके सुद्धा आलेली आहेत. झाडू तयार करण्याच्या कामात हातभार लावत आहेत. ही बालके स्वगावी शाळेत जात आहेत. शिक्षण घेत आहेत. हल्ली मात्र ही बालके गेल्या आठ दहा दिवसापासून झोपड्याशेजारी खेळत बागडत दिसत होते.सर्व शिक्षा अभियान व प्रगत शैक्षणिक धोरणाअंतर्गत शाळाबाह्य बालकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवित असलेले विषय साधन व्यक्तींना ही बालके दिसली असता, त्यांनी या बालकांसाठी दिवाळीची भेट म्हणून वह्या, पेन, पेन्सील, वाचनपुस्तके, चित्रपुस्तके व खाऊ बिस्कीटे दिलीण बालकांसोबत संवाद चर्चा केली. शैक्षणिक खेळ लेखन करून घेतले. छत्तीसगडला परतताच शाळेत पाठविण्यासाठी महिला पालकांना समजावून सांगितले. समुपदेशन केले. बालकांच्या हातात पेन, वही, पुस्तके येताच त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. त्यांची बोटे हळूच अक्षरे, चित्रे अंक गिरवू लागली. विसरलेले ते सर्व पाढे, कथा, चित्रे या बालकांना आठवू लागले. स्वगावी परतताच शाळेत जाण्याची तयारी या मुलांनी दाखविली. या उपक्रमात भंडारा गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती राम वाडीभस्मे, अरुण झुरमुरे, अश्विन रामटेके, अर्चना बेदरकर, हेमलता सरादे, वनिता भेंडारकर यांनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)
अन् बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
By admin | Published: October 29, 2016 12:35 AM