भोजापूर, ता. भंडारा
भंडारा : वर्षभरापूर्वीच गीता आणि विश्वनाथ यांचे लग्न झाले. नांदा सौख्यभरे या आशेसोबत गीताने विश्वनाथसोबत सुखमय जीवन सुरू केले. सुखी संसाराच्या वेलीवर वर्षभराच्या आत म्हणजे १० नोव्हेंबर २०२० ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, जन्मतः तिचे वजन कमी असल्याने तिला एसएनसीयू वाॅर्डात हलविण्यात आले. मात्र, नियतीने घात केला. शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत गोंडस मुलगी मरण पावली. ही दुःखद घटना आहे, भोजापूर येथील रहिवासी असलेल्या गीता विश्वनाथ बेहरे यांची. वयवर्ष वीस असलेल्या गीताचे हे पहिलेच बाळ होते. मोलमजुरी व अन्य लहान-मोठी कामे करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या विश्वनाथ व गीतावर दुःखाचा डोंगरच कोसळला. नऊ महिने पोटात सांभाळून तिला जन्म देणाऱ्या गीतावर नियतीने घाला घातला. ‘‘बाबूजी मेरी लडकी मुझे ला दो’’ असे शब्द हुंदके घेत बोलली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी गीता निःशब्द झाली. भोजापूर येथील सोनझारी वस्तीत राहणारे बेहरे कुटुंबीय अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. अशा स्थितीत शासनाने तोकडी मदत न करता किमान दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली.