भंडारा : शहरातील साई मंदिर मार्गावरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत अनेक छोट्या व्यावसायीकांनी दुकानदारी थाटली होती. मात्र आज शुक्रवारला पालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारची सुचना न देता अचानक त्यांच्या दुकानांवर अतिक्रमण हटावचा बडगा उगारला. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येणार असल्याने व्यावसायीकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गाव असो वा शहर, प्रत्येक ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजुला छोटी-मोठी दुकाने थाटून संसार चालविणारे अनेक आहेत. फुटपाथ म्हटल्या जाणाऱ्या या जागांवर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दुचाकी दुरूस्ती करणारे, हॉटेल व्यावसायीक, चॉयनिल चालक, भेलपूरी व गुपचुप हातठेलाधारक, मुर्तीकार व पेंटर, कपडे प्रेस करणारा, देवांसाठी हार बनविणारे व पाणठेला व्यावसायीकांचा समावेश आहे. शहरातील मुख्य मार्गा असलेल्या जिल्हा परिषद चौकातील तुमसर राज्य मार्गालगत असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीलगत या व्यावसायीकांनी आपल्या दुकानदाऱ्या थाटल्या. मागील काही दिवसांपासून या दुकानांच्या माध्यमातून या व्यावसायीकांनी त्यांचा संसाराला आकार दिला. यातुन त्यांनी आर्थिक प्रगती करून कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या या मार्गावर थाटलेल्या दुकानदारी एका 'क्लास वन' अधिकाऱ्याला खटकली. या अधिकाऱ्याच्या आदेशावरून पालिका प्रशासनाने अचानक आपला मोर्चा येथील अतिक्रमणधारकांच्या दुकानांकडे वळला. कुठल्याही प्रकारची पूर्वसुचना न देता या दुकानदारांना स्वच्छता मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून अतिक्रमीत दुकाने हटविण्याचे आदेश दिले. अचानक आलेल्या या तोंडी आदेशामुळे दुकानदारांवर आभाळ कोसळल्यागत झाले. पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक अचानक दुकानासमोर येऊन अतिक्रमणाचा बडगा उगारण्याचा प्रयत्न करीत असल्याने, दुकानदारांचे डोळे अश्रुंनी पाणावले. अनेक दिवसांपासून या दुकानांच्या माध्यमातून आनंदात संसार चालवून कुटूंबाचे पालनपोषण करणाऱ्या व्यावसायीकांवर यामुळे उपासमारीचे संकट ओढविणार आहे. या कारवाईने त्यांचा कुटूंबाची वाताहत होणार आहे. ज्या दुकानांनी त्यांना समाजात ताट मानेने जगण्याचे बळ दिले. त्या हातठेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने उचलून घरी नेण्याचा प्रसंग ओढवला. यावेळी त्यांचे कंठ दाटून आल्याचे चित्र दिसून आले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गावर असलेल्या रस्त्यालगत या व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन दुकान थाटली होती. त्यांचे अतिक्रमण बांधकाम विभागाने काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घेवून दुकानांवर बडगा उगारला. या कारवाई दरम्यान बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी तिथे नसल्याने कारवाईबाबत शंकेला पेव फुटले. नगर पालिकेचे फक्त तीन कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ढूंकूनही न बघितल्याने या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण स्पष्ट झळकत होता. फक्त तीन कर्मचाऱ्यांचा खांद्यावर अतिक्रमण निर्मुलनाचा डोलारा पेलविण्यात आला होता. त्यांच्या सुरक्षेसाठी दोन पोलिस कर्मचारी तैनात होते. जनक्षोभ उसळला असता तर या तीन कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही अडचणीत आले असते. मात्र या अतिक्रमण निर्मुलनाची फिकीर वरिष्ठ अधिकाऱ्यांना नसावी असेच आजच्या मोहिमे दरम्यान जाणवले.पाषण हृदयी प्रशासनाला ‘हातावर कमविणे, पानावर खाणाऱ्या’ हाडमासाच्या इसमावर दया आली नाही. नियोजन न करता अतिक्रमण निर्मुलनाची मोहिम राबविणे हे कितपत योग्य आहे. असा सवाल ही फुटपाथ दुकानदार विचारत होते. त्यांची रोजीरोटी तर बुडालीच त्याजोगे भविष्याची चिंताही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. (शहर प्रतिनिधी)
अन् डोळे अश्रुंनी पाणावले...
By admin | Published: December 20, 2014 12:41 AM