पालिकेचे दुर्लक्ष : क्रांती वॉर्डात समस्यांचा डोंगरभंडारा : स्वच्छ शहर, सुंदर शहर ही परिभाषा असलेल्या भंडारा नगरपालिका प्रशासनाचे शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पालिका प्रशासनाला नालितील गाळ व समस्यांची माहिती दिल्यानंतर दुर्लक्ष करण्यात आल्याने माजी नगरसेवकाने हातात पावडा घेवून स्वत:च नालीतील गाळ उपसल्याचा प्रकार आज शनिवारी सकाळी क्रांती वॉर्डात घडला. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौक परिसरातील छोटा बाजार परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती वॉर्डात मागील काही दिवसांपासून समस्यांचा डोंगर आ वासून उभा आहे. याबाबत वॉर्डवाशीय तथा माजी नगरसेवक भरत लांजेवार यांनी अनेकदा पालिका प्रशासनाला माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून समस्या निराकरणाचा प्रयत्न झाला नाही. प्रभाग पद्धतीत असलेल्या या वॉर्डाचे प्रतिनिधीत्व चार नगरसेवक करीत आहेत. त्यात खुद्द नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्यासह करूणा घोडमारे, आशा उईके, पृथ्वी तांडेकर यांचा समावेश आहे. स्वत: नगराध्यक्ष प्रतिनिधीत्व करीत असल्याने या वॉर्डात समस्या नसाव्या, असा समज शहरातील नागरिकांना आहे. मात्र परिस्थिती विपरीत असल्याचे नालीतील गाळ उपसा प्रकरणावरून समोर आले.मागील महिन्याभरापासून येथील तुंबलेल्या नाल्यातील गाळ उपसा करावा, अशी मागणी पालिकेकडे केल्यानंतरही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा झाला. त्यामुळे माजी नगरसेवक भरत लांजेवार यांनी आज सकाळी पालिका प्रशासनाचा निषेध करत स्वत:च पावडे हातात घेवून वॉर्डातील नाली साफ सफाई अभियान राबविले. माजी नगरसेवक स्वत: नालितील गाळ उपसा करीत असल्याचे बघून बघ्यांची गर्दी झाली तर काहींनी यात पुढाकार घेवून गाळ उपसा केला. ही बाब नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांना माहित होताच त्यांनी तिथे हजेरी लावली.एका माजी नगरसेवकाने वॉर्डातील नाल्यांची सफाई करण्यासाठी हातात घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असून पालिका प्रशासनानेही यात सहभागी होवून शहरातील नाल्यांमध्ये साचलेला गाळाची सफाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी )
अन् माजी नगरसेवकाने उपसला नालीतील गाळ
By admin | Published: May 08, 2016 12:33 AM