युवराज गोमासे
भंडारा : घरगुती कौटुंबिक कारणावरून व गैरसमजुतीतून एकाच घरात वेगवेगळे राहणारे पती-पत्नी वरठी पोलिसांच्या मध्यस्थीने एकत्र आले. म्हातारपणात का होईना, एकमेकांसोबत एकत्र राहण्याचा व शेवटच्या क्षणापर्यंत सुख-दु:खात सहभागी होण्याचे समझोतापत्र २ जुलै रोजी वरठी पोलिसांना लिहून देत त्यांनी एकत्र संसाराला सुरुवात केली. पतीचे नाव रामचंद्र दशरू भिवगडे (८०), तर पत्नीचे नाव कुंताबाई रामचंद्र भिवगडे (७०, दोन्ही रा. पाचगाव) असे आहे.
मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथील रामचंद्र भिवगडे हे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत. त्याची पहिली पत्नी आजारी राहायची. रामचंद्रने दुसरे लग्न कुंताबाईशी केले. पहिल्या पत्नीला चार मुली, तर दुसऱ्या पत्नीला दोन मुले व एक मुलगी झाली. मुलांच्या लग्नानंतरही गुण्यागोविंदाने संसार सुरू असतानाच कुंताबाई व रामचंद्र यांच्यात क्षुल्लक कारणांवरून खटके उडायचे. रामचंद्र पहिल्या पत्नीसोबत, तर कुंताबाई वेगळी राहू लागली. तब्बल २० वर्षे त्यांच्यात दुरावा व बोलाचाली बंद होती. अनेकदा शेजारी व नातेवाइकांनी समजाविले. दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
कुंताबाईने मोलमजुरीतून शौचालय बांधले. रविवारी (दि. २ जुलै) रामचंद्र शौचालयात जाण्यासाठी निघाला असता कुंताबाईने अटकाव केला. दोघांमध्ये भांडण झाले व तक्रारीसाठी ते वरठी पोलिसांकडे आले. सहायक फाैजदार विजय सलामे, पोलिस नायक कोमल रोहटकर यांनी तंटामुक्त गाव समिती पदाधिकाऱ्यांना बोलाविले. दोघेही समजण्यास तयार नसल्याने पदाधिकारी हतबल झाले. पोलिसांनीच दोघांना म्हातारणातील अडचणींचे समुपदेशन केले. अखेर दोघांचेही मन द्रवीत झाले व त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
वरठी पोलिसांनी दिला माणुसकीचा परिचय
पोलिसांच्या भावनिक समुपदेशानामुळे पती-पत्नी भावुक झाले. दोघांनीही शेवटपर्यंत वादविवाद करणार नाही, आमचा मनमुटावा संपला, असा आपसी समझोता लिहून दिला. पोलिसांनीही माणुसकीचा परिचय देत दोघांना चहापाणी देत पोलिस गाडीने त्यांच्या घरी सोडून देत निरोप घेतला. पोलिसांच्या या स्तुत्य कार्याचे कौतुक होत आहे.
...अन् दुभंगलेले मन जुळले
क्षुल्लक भांडण पोलिस ठाण्यात आले. पती-पत्नी ऐकमेकांस समजून घेण्यास तयार नव्हते. याप्रकरणी ठाणेदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात दोघांनाही म्हातारपणातील अडचणी व कुणी कुणाचे करीत नसल्याचे समुपदेशन प्रत्यक्ष उदाहरणे देत केले. दोघांनाही ते पटले व दुभंगलेले मन पुन्हा जुळले.
- विजय सलामे, सहायक फाैजदार, वरठी.