कळवळा उपेक्षितांचा : तहसीलदारांची आनंद मतिमंद शाळेला भेटविरली (बु.) : समाजात मतिमंदांकडे उपहासाने पाहिले जाते. कुटूंबात मतिमंद मुलगा जन्माला येणे हे अभिशाप मानले जाते. या मुलांपासून समाज चार हात दूर राहणे पसंत करतो. समाजापासून उपेक्षित असलेल्या या मतिमंद विद्यार्थ्यासोबत लाखांदूरचे तहसीलदार विजय पवार यांनी आपल्या पत्नी व मुलासह सुमारे दोन तास घालवून त्यांची आस्थेने विचारपूस केली. या ममतापूर्ण भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.प्रसंग होता येथील आनंद निवासी मतिमंद शाळेला तहसीलारांनी दिलेल्या सहकुटूंब भेटीचा. सुटीच्या दिवशी अगदी सायंकाळी तहसीलदारांचे शाळेत आगमन झाल्याने थोडावेळ शाळेतील वसतीगृहाचे कर्मचारी गोंधळले. मात्र यावेळी पवार प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे तर एक सदृश्य कुटूंबवत्सल व्यक्ती म्हणून शाळेत आले होते. त्यांनी व पवार यांनी शाळेत पोहचताच उपस्थित विद्यार्थ्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊची पाकिटे देवून या विद्यार्थ्याविषयी आपल्या मनातील वात्सल्य प्रकट केले. येथील काही विद्यार्थी, स्पष्टपणे बोलू शकत नाहीत मात्र, या भेटीमुळे त्यांना आनंद झाल्याचे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होते.यावेळी तहसीलदारांनी शाळेचे अधिक्षक नामदेव लांडगे आणि लिपीक हरिश्चंद कोरे यांच्याकडून शाळेच्या सोयीसुविधांची माहिती जाणून घेतली. त्याच प्रमाणे सर्व वर्गखोल्यांची पाहणी करून विद्यार्थ्यांची वर्गवारी आणि त्यांना शिकविण्याच्या पद्धतीविषयी माहिती जाणून घेतली. प्रोफेशनल असिस्टंट फॉर नॅशनल डेव्हलपींग अॅसेट्स, नागपूर या संस्थेद्वारा संचालित या विनाअनुदानीत मतिमंद शाळेत विद्यार्थ्यांाा शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. बसविण्यात आला आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, झोपण्यासाठी पलंग-बेड, ब्लँकेट, खेळण्यासाठी क्रिडागण आणि क्रिडासाहित्य, मनोरंजनासाठी टी.व्ही. संच आणि सी.डी. प्लेअर आदी सुविधा उपलब्ध गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा विनाअनुदान तत्वावर सुरू असून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. ८ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार अनुदाना पात्र १२३ अपंग शाळांच्या यादीत या शाळेचा समावेश आहे. (वार्ताहर)
आणि मतिमंदांच्या आनंदाला उधाण आले
By admin | Published: December 31, 2015 12:31 AM