लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळेचा पहिला दिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. त्या अनुषंगाने येथील जनता विद्यालयात चक्क घोडागाडीत विद्यार्थी बसून शाळेत प्रवेश केला. या आगळ्या वेगळ्या स्वागताने चिमुकले विद्यार्थी व पालक भारावून गेले.फुलांनी सजविलेल्या घोडागाडीने सुमारे ७५ विद्यार्थ्यांनी टप्प्याटप्प्याने शाळेत प्रवेश केला. नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वर्ग ५ व ८ च्या विद्यार्थ्यांना गोड जेवण (खीर) देण् यात आली. फुलांनी सजविलेली घोडागाडी पाहून विद्यार्थी आनंदित झाले. विद्यार्थ्यांनी प्रथमच घोडागाडीत बसण्याचा आनंद घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांना खूप मजा आली. शाळेत पुस्तक दिन व राजश्री शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी मुख्याध्यापक सुनिल नासरे, उपमुख्याध्यापक एस.एन. लंजे, पर्यवेक्षक भेलकर, शिक्षकवृंद पंकज बोरकर, राजू गभणे, अजय बोरकर यांनी पुस्तक दिनाचे महत्व सांगितले. याप्रसंगी शिक्षिका कटरे, बिसेन, बावनकर, गाढवे , आरामे व शिक्षकवृंद तथा पालकवृंद उपस्थित होते.
कुंकवाच्या पावलांनी विद्यार्थ्यांचा शिक्षणारंभ!साकोलीत शाळेच्या पहिल्या दिवशी वेगळे काहीतरी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या असोशीपोटी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल झाडगाव येथे चक्क विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन ते जपून ठेवण्याच्या एक जबरदस्त उपक्रम राबवला, पालकांना तर तो जाम आवडलाही. विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन शाळा सोडताना विद्यार्थ्यांना ते ठसे द्यायचे असा उपक्रम राबवण्यात आला. ‘हा माज्या जीवनातील शिक्षणाचे पहिले पाऊल’ असे या उपक्रमाचे नाव आहे. शाळेत प्रवेश झाल्याबरोबर स्त्री सदस्यांनी चौरंगपाटावर मुलांचे पाय धुतले आणि पुष्प देऊन स्वागत केले. पहिलीतील विद्यार्थ्यांचा उजवा पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून त्याचा ठसा घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे शाळा जपून ठेवणार आहेत आणि शाळा सोडताना दाखल्याबरोबरच विद्यार्थ्यांला पायाचा ठसा असलेला कागद देण्यात येईल.