अवैध जनावरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबागड गावातील अवैध जनावरे वाहतुकीला बंदी आल्याने या गावात आता अवैध मोहफूल दारू व्यवसायाने पाय पसरले असल्याची गुप्त माहिती एका खबऱ्याद्वारे पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांना दिली. पोलिसांनी सापळा रचून आंबागड गावातील जंगलात अवैधरीत्या सुरू असलेल्या मोहफूल दारूच्या भट्टीवर यशस्वीरीत्या धाड मारली. या धाडीतून ३० लिटर मोहफुलाच्या दारूसह २५ किलोच्या ४५ प्लास्टिक बॅग, जर्मन करच्या, मातीचे मडके, जळाऊ काड्या, प्लास्टिक पाइप व इतर साहित्यासह एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काही साहित्य तेथेच नष्ट करण्यात आले. आरोपी सोनू ऊर्फ ईश्वर नारबा बडवाई, रा. पिपरा व कैलास महादेव साठवणे, रा. तुमसर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिलेल्या क्रॅकडाऊन विशेष मोहिमेच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी, पोलीस शिपाई मंगेश पेंदाम, नवनाथ सिदने, अभिलाष ढोबरे यांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे. आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेले अवैध धंदे बंद करण्यावर ठाणेदारांनी भर दिला असल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.