राहुल भुतांगेतुमसर (भंडारा) : कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. या प्रकाराने हतबल झालेल्या तालुक्यातील खरबी येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील उभ्या टोमॅटो पिकात ट्रॅक्टर चालविला. अक्षय तृतीयेच्या दिवशी या शेतकऱ्याने उचललेले पाऊल शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे वास्तव होय.आनंद सिंगनजुडे, रा. खरबी, असे शेतकऱ्याचे नाव आहे. आनंद सिंगनजुडे हे गावचे सरपंचही आहेत. खरबी-विहीरगाव शेतात तीन एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली होती. पाण्याचा योग्य वापर व्हावा या उदात्त हेतूने ठिबक सिंचनचा उपयोग करीत होते. एक लाख रुपयांचे टोमॅटो रोपे एका कृषी प्रोड्युसर कंपनीकडून खरेदी केली होती. मजुरांच्या मदतीने लागवड करण्यात आली. दरम्यान, विविध बँका, सावकार व हातउसने स्वरूपात पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.कोरोनाच्या सावटात बाजारात टोमॅटोला योग्य भाव मिळत नव्हता, तर आता संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. मागेल त्या भावात ग्राहकांना टोमॅटो गावात विकावे लागत आहेत. टोमॅटोच्या बागेतील टोमॅटो रोपे लागवड, मजूर, ठिबक सिंचन संच, मशागत, रोगांवर नियंत्रणासाठी महागडी औषधी व फवारणी खर्च आवाक्याबाहेर जात पाच लाख रुपये खर्च केले. मात्र, टोमॅटोच्या बागेतून उत्पादन व लागवडीचा खर्च निघेनासा झाला. पाच लाख रुपये खर्च करून एक लाख रुपयेही नफा कमाविता येत नसल्याने हतबल शेतकऱ्याने शुक्रवारी टोमॅटोच्या शेतीत चक्क ट्रॅक्टर नांगर चालवून बाग उद्ध्वस्त केली. शेतात राबराब राबून भाजीपाला विकण्यासाठी सध्या गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. त्यानंतरही मोठे नुकसान होत आहे. अशी अवस्था एकट्या आनंदचीच नाही, तर जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांची आहे."नागपूर येथून टोमॅटोचे रोपटे खरेदी करून तीन एकरांत लागवड केली. यंदा कोरोनाच्या सावटात बाजारपेठा बंद, उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात टोमॅटो तोडणीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. नाइलाजाने तीन एकरांतील टोमॅटोच्या बागेत ट्रॅक्टरने नांगर चालवून पीक उद्ध्वस्त करावे लागले."- आनंद सिंगनजुडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.
अन् संतप्त शेतकऱ्याने ऐन अक्षय्य तृतीयेलाच टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 9:12 PM