लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील येरली येथील तरुणाच्या खून प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक केल्याच्या निषेधार्थ शनिवारी रात्री ग्रामस्थांनी तुमसर पोलीस ठाण्यावर धडक दिली. आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात नाहक गोवण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. पोलिसांनी ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर गावकरी माघारी फिरले. या प्रकारानंतर येरली गावात संतापाचे वातावरण असून, गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.येरली येथील दिलेश उर्फ मायकल वाघमारे या तरुणाचा धारदार शस्त्राने ६ ऑक्टोबरला सकृतदर्शनी धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी केवळ अरविंद उर्फ पिंटू इस्तारू पारधी या एकच आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या हत्या प्रकरणात एकापेक्षा अधिक आरोपी असल्याचा आरोप समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी लावून धरत तुमसर पोलिसांना घेराव घातला होता. तसेच पोलीस ठाण्यात निदर्शने केली होती. दरम्यान, मृतकाच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत काही व्यक्तींचे नाव आरोपी म्हणून नमूद केले होते. मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केला होता. परिणामी तब्बल १२ दिवसांनंतर समाजबांधव व संघटनेने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करून पोलिसांनी या घटनेची पुन्हा चौकशी सुरू करण्याची मागणी केली. चौकशीअंति त्या हत्याकांडात अरविंद पारधी व्यतिरिक्त आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये शुभम कटरे, मदन शरणागत, आकाश पारधी, देवानंद शरणागत यांचा समावेश होता. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी येरली येथील नंदू रहांगडाले याला अटक करण्यात आली. नंदू रहांगडाले याला या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा आरोप करीत शनिवारी रात्री शेकडो नागरिक तुमसर पोलीस ठाण्यात जमा झाले. सुमारे तीन तास नागरिक पोलीस ठाण्यात जमा होते. त्यामुळे भंडारा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलविण्यात आली होती. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर गावकरी माघारी फिरले. पोलिसांनी नंदू रहांगडाले याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांनी दिली.
गावात संतप्त वातावरणनंदू रहांगडाले याच्या अटकेमुळे येरली गावात संतप्त वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी गावात पोलूस बंदोबस्त लावण्यात आला आहे. अटकेच्या निषेधार्थ गावातील कुणीही व्यक्ती कामावर गेला नाही. घरीच राहून त्यांनी कारवाईचा निषेध केला.