लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मुंढरी खुर्द येथे पशुवैद्यकीय दवाखाना मुुंढरी बुजच्या वतीने माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधार क्रमांक देण्याच्या कामाचा शुभारंभ १४ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणावर करण्यात आला. यावेळी मुंढरी बुज पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दरवाडे, कर्मचारी सपाटे व पशुमित्र नंदूरकर यांनी गावातील ९० जनावरांना आधारक्रमांक दिला.जनावरांना ओळख मिळवून देण्यासाठी शासनाची ही योजना आहे. सदर योजना देशभरातील सर्व जनावरांसाठी राबविली जात आहे. जनावरांची जात, वर्ग, देशी, विदेशी, शिंगे सरळ कि वाकडे, शेपूट, बांधा, त्यांचा रंग आदी माहिती या आधारक्रमांकासोबत मिळणार आहे. तसेच दुधाळ जनावरांची माहिती सर्व प्रथम संकलीत केली जाणार आहे.जनावरांची माहिती मिळविणे हा हेतू असला तरी गोमातांची कत्तलही या युनिक नंबरमुळे थांबविता येणार आहे.जनावरांना १२ अंकी विशिष्ट ओळख क्रमांक असलेले आधार कार्ड देण्यात येणार असून ते फायबरचे राहणार आहे. ते जनावरांच्या डाव्या कानाला बसविले जात आहे. काल कापला किंवा जनावरांचा मृत्यू झाला तरच हा टॅग निघेल.जनावरांना स्वत:ची ओळख मिळाल्याने चोरीचे प्रमाण आटोक्यात येईल. विक्री व्यवसायासाठी भविष्यात दाखल्याची गरज भासणार नाही. आधार कार्डानुसार गाय, म्हशीला टॅग दिल्यावर लसीकरण, रेतन, व्यायली कधी, काय जन्मली या बाबतची माहिती आॅनलाईन उपलब्ध राहणार आहे.मुंढरी परिसरात या कामाचा शुभारंभ मुंढरी खुर्द गावापासून करण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी करतेवेळी डॉ. दरवाडे यांनी परिसरातील पशुपालकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अन्य गावातही ही योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ओळख निर्माण होणार आहे.
मुंढरीत नागरिकांप्रमाणे जनावरांनाही आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 10:32 PM
मुंढरी खुर्द येथे पशुवैद्यकीय दवाखाना मुुंढरी बुजच्या वतीने माणसाप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र ओळख दाखविण्यासाठी आधार क्रमांक देण्याच्या कामाचा.....
ठळक मुद्देशुभारंभ : पशुपालकांनी सहकार्य करावे