भंडारा : 'शेतकऱ्याईचा वावरात निंघते किस, दलालाईच्या घरी पडते पैशाईचा पाऊस' या ओळी आहेत. झाडीबोलीची बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री अंजनाबाई खुणे यांच्या शेतकरी व्यथा मांडणाऱ्या कवितेच्या. लाखांदूर तालुक्यातील मुर्झा येथे आयोजित २८ व्या साहित्य संमेलनात दुसऱ्या दिवसाच्या 'रामचंद्र डोंगरवार मांडवात' आयोजित कविसंमेलनात अध्यक्षस्थानाहून त्या झाडीबोलीतील कविता सादर करत होत्या.
' कोलू पाटलानी बांध नवेगावी बांधला, पैसा खर्च करून गा सोता घाम काहाळला' ही दुसरी कविताही त्यांनी सादर करून रसिकांची दाद मिळविली. यावेळी व्यासपीठावर झाडीबोलीचे प्रवर्तक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाध्यक्ष डाॅ. संजयकुमार निंबेकर, ज्येष्ठ साहित्यिक हिरामन लांजे, लखनसिंह कटरे, ना. गो. थुटे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डाॅ. हेमकृष्ण कापगते आदी उपस्थित होते. या सर्वांनीही कविता सादर करून संमेलनाची रंगत वाढविली.
कविसंमेलनात जवळपास ५० चे वर कवींनी सहभाग घेतला. यात संतकवी डोमा कापगते, सुभाष धकाते, पालिकचंद बिसने, लता पुस्तोडे, बालकवी हुपेश कापगते, भूषण कापगते, पांडुरंग नंदागवळी, टेकराम निंबार्ते, सुखदेव चौथाले, दिवाकर मोरस्कर, सु. वि. साठे, सपना बन्सोड, त्रंबक बन्सोड, पंडित लोंढे, लक्ष्मण खोब्रागडे, चंद्रकांत लेनगुरे, उपेंद्र रोहनकर, मुरलीधर खोटेले, लोकराम शेंडे, चुडीराम पाथोडे, तारका रूखमोडे, अरूण झगडकर, प्रेमेश्वर बारसागडे, संजीव बोरकर, सुशील खापर्डे, नरेश नवखरे, तुलाराम चोले, डाॅ. समीर गहाणे, सुनील सरपाते, समीर ठलाल आदी कवींनी विविध विषयांवरच्या मनोवेधक कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे संचालन प्रा. अश्विन खांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन खुशाल झोडे यांनी केले.