भंडारा : पहिल्या लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. भंडारा तालुक्यातील गराडा येथे रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रुग्ण निघाल्याचे माहीत होताच रस्तेही निर्मनुष्य झाले होते. आता वर्षभरात जिल्ह्यात ४६ हजार ५३ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ३४ हजार ५५८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ७३८ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
राज्यात मार्च २०२०पासून सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू होते. मात्र भंडारा जिल्हा त्यापासून दूर होता. मात्र २७ एप्रिल २०२० रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला पाॅझिटिव्ह आढळून आली होती. संपूर्ण जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली. कोरोनामुक्त असलेल्या भंडाऱ्यात पहिला रुग्ण आढळला होता. प्रशासनही सतर्क झाले होते. बाधित महिलेला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर संपूर्ण गराडा गाव कंटेन्मेंट झोन घोषित करून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सर्वत्र सामसूम दिसत होती. भंडारा शहरातही सर्व रस्ते त्या दिवशी निर्मनुष्य झाल्यासारखे दिसत होते. मात्र त्यानंतर हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. आता तर तब्बल ४६ हजार २५३ रुग्ण आतापर्यंत आढळल्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे वर्षभरात आढळलेल्या पेशंटच्या बरोबरीने एकट्या एप्रिल महिन्यात रुग्ण आढळून आले. पहिल्या लाटेतील एप्रिल महिना आणि दुसऱ्या लाटेतील एप्रिल महिना यात जमीन आसमानचे अंतर दिसत आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात एकच रुग्ण होता, तर यावर्षी एप्रिल महिन्यात १० हजार ७५७ ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्हा राज्यातील टाॅप टेन जिल्ह्यात जाऊन पोहचला. पहिल्या लाटेत ग्रामीण भाग कोरोनापासून दूर होता. परंतु आता दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील तब्बल ७०० गावांना कोरोनाने विळखा घातला आहे. मृत्यूचे प्रमाणही अलीकडे वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील एप्रिल महिन्यात ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३४ हजार ५५८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु आता शेवटच्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून, कोरोनाबाधितांची संख्याही कमी होत असल्याचे दिसत आहे.
बाॅक्स
महिनावार कोरोना रुग्ण
महिना पाॅझिटिव्ह कोरोनामुक्त
एप्रिल ०१ ००
मे ३० ०१
जून ४९ ६९
जुलै १७० १२९
ऑगस्ट १०३६ ५८९
सप्टेंबर ३९५८ २८६०
ऑक्टोबर ३०८१ ३७५७
नोव्हेंबर १५६४ १५८४
डिसेंबर १५८५ २१६७
जानेवारी ८६७ १०३३
फेब्रुवारी ४५२ ३७०
मार्च ३९७१ १६४९
एप्रिल २७६७६ १८४२५
बाॅक्स
जिल्ह्यात १२ जुलै रोजी मृत्यूची पहिली नोंद
भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर कोरोनाने पहिल्या मृत्यूची नोंद झाली. १२ जुलै रोजी भंडारा शहरातील एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतरही मृत्युदर नियंत्रणात होता. या जुलै महिन्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये २१, सप्टेंबर ९२, ऑक्टोबर १००, नोव्हेंबर २०, डिसेंबर ३९, जानेवारी ३१, फेब्रुवारी ५, मार्च १६ आणि एप्रिल महिन्यात २६ तारखेपर्यंत ३७३ अशा ७३८ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
आतापर्यंतच्या चाचण्या ३६६९८१
कोरोनाचे एकूण रुग्ण ४६०५३
बरे झालेले रुग्ण ३४५५८
एकूण कोरोना बळी ७३८
सध्या उपचार सुरू असलेले १०७५७