जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र : सेंदुरवाफा पंचायत समिती सदस्याचे पद होणार रद्द संजय साठवणे साकोलीमागील दोन वर्षापासून साकोली -सेंदुरवाफा येथील नगर परिषदेचे स्वप्न आमदार बाळा काशीवार यांच्या प्रयत्नाने लवकरच पुर्ण होणार आहे. साकोली-सेंदुरवाफा नगर परिषदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सेंदुरवाफा येथील पंचायत समिती सदस्या धनवंता राऊत यांचे पदही रद्द होणार असल्याचे पत्रही जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाले आहे.साकोली ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत व्हावे याकरिता मागील दहा वर्षापासून माजी आमदार सेवक वाघाये प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व मागील वर्षी साकोली नगरपंचायतची अधिकृत घोषणाही झाली होती. व त्या अनुषंगाने आॅक्टोबर २०१५ ला साकोली नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यावेळी उमेदवारांचे अर्जही भरण्यात आले होते. मात्र साकोली नगरपंचायत ऐवजी साकोली नगर परिषद करण्यात यावी व या निवडणुकीवर स्थगिती यावी म्हणून माजी सभापती मदन रामटेके यांनी न्यायालयात धाव घेऊन या निवडणूक प्रक्रियेवर ७ आॅक्टोबर २०१५ रोजी न्यायालयातून स्थगिती मिळविली. तेव्हापासून साकोली नगरपंचायतची प्रक्रिया थांबली असून मागील दोन वर्षापासून साकोली नगरपंचायतीवर प्रशासक आहेत. यानंतर साकोली व सेंदुरवाफा दोन्ही गावे मिळून नगरपरिषद व्हावी यासाठी आमदार बाळा काशीवार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात ३१ मे २०१६ ला ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून नगर परिषदेसंदर्भात हालचालींना वेग आणला. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सेंदुवाफा पंचायत समिती सदस्य यांना ग्रामविकास विभागाचे ३१ मे २०१६ चे पत्रान्वये साकोली नगर परिषद स्थापन करताना सेंदुरवाफा पंचायत समिती गणाचे ५२९ हेक्टर ७६ आर इतके सर्वक्षेत्र प्रस्तावित साकोली नगर परिषदेत समाविष्ठ होत आहे. सदर क्षेत्र व सदर क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम २५७ अन्वये रद्द करणे क्रमप्राप्त असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे संबंधित पंचायत समिती सदस्याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी याच आठवड्यात देण्यात आली आहे. पंचायत समिती सदस्य राऊत यांचे म्हणणे ऐकल्यानंतर काही दिवसातच तसा अहवाल सादर होवून लवकरच सेंदुरवाफा ग्रामपंचायत संपुष्टात येईल व तशी घोषणा होऊन साकोली सेंदुरवाफा नगर परिषदेची घोषणा होईल, सार्वत्रिक निवडणुकीसोबतच साकोलीतही निवडणूक होईल, असे संकेत मिळाले आहेत.शासनाने साकोली नगरपंचायती ऐजी नगरपरिषद घोषित करावी जेनेकरून दोन्ही गावाच्या विकासाकरीता अधिक निधी येऊन दोन्ही गावांचा विकास होईल. याकरिताच आपण न्यायालयातून स्थगिती आणली. शासनातर्फे नगरपरिषदेबाबत होत असलेली कार्यवाही ही स्वागतार्थ असून हा विजय जनतेचा आहे.-मदन रामटेके, याचीकाकर्ता
साकोली नगर परिषदेची घोषणा लवकरच
By admin | Published: June 24, 2016 1:15 AM