प्रशांत पवार : जिल्हा बँकेला नोटा स्वीकारण्यापासून डावलले भंडारा : भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील जिल्हा सहकारी बँकेने ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारू नये, असा आदेश दिला. भारतातील शेतकऱ्यांसाठी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला आहे.जिल्हा सहकारी बँकांचे जाळे ग्रामीण भागात विखुरले आहे. भारतामध्ये ३७१ जिल्हा सहकारी बँका असून १४,०६० शाखांच्या माध्यमातून त्यांचा व्यवहार सुरु आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा सहकारी बँका मुख्यत: शेतकरी व शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेसाठी काम करतात. शेतकऱ्यांना आता धान्याचे पैसे येणे सुरु झाले आहे. त्यामुळे ५०० व १००० रूपयांच्या नोटा शेतकऱ्यांकडून स्वीकारू नये, असा आदेश काढल्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर जमा करता येत नाही आणि बँकेकडून त्यांना नोटा बदलवूनही मिळत नाही. ज्या शेतकऱ्याकडे लग्नकार्य असेल त्यांनी आता कसे करावे. शेतकऱ्यांचे जिल्हा बँकेशिवाय अन्यत्र खाते नाही. त्यांचेजवळ एटीएम किंवा डेबीट कार्ड नाहीत. त्यामुळे दररोजचा आर्थिक व्यवहार कसा करावा, अशा एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांना भेडसावणार आहेत.आतापर्यंत सतत तीन वर्षाच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याचे चित्र दिसत आहे. असे असताना ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद करून आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जिल्हा बँकेवर निर्बंध घालून शेतकऱ्यांसाठी चिता रचण्याचे काम हे सरकार करीत आहे. रिझर्व्ह बँकेने जिल्हा सहकारी बँकेत पुन्हा व्यवहार सुरु न केल्यास नागपूर येथील रिझर्व्ह बँकेसमोर उपोषणाला बसण्याचा ईशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
हा तर शेतकरी विरोधी निर्णय
By admin | Published: November 16, 2016 12:38 AM