भंडारा : येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त आभासी (ऑनलाईन) कार्यक्रमाचे आयोजन करून स्वयंसेवकांना दहशतवादविरोधी शपथ देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या संदेशात डाॅ. ढोमणे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, दहशतवादविरोधी लढ्यात आपण सुजाण व जागरुक नागरिकाची भूमिका स्पष्टपणे बजावली पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनीकर यांनी, दहशतवादी हे तंत्रज्ञानाने आपली गोपनीय माहिती चोरून अनेक गुन्हे घडवितात. सायबर गुन्हेगारी ही अत्यंत देशविघातक व विनाशकारी दहशतवाद आहे, असे मत मांडले.
संचालन प्रा. प्रशांत वालदेव यांनी केले, तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज श्रीरामे यांनी मानले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सागर ठाकरे, विशाल सहारे, पूजा खोब्रागडे, हिना डुंभरे, पूजा पारस्कर, सुप्रिया वाढई, प्रणोती नेवारे व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.