संतोष जाधवर
भंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक रुग्ण उपचारासाठी कोविड केअर सेंटरचा आधार घेत आहेत. मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने आता सरकारी रुग्णालयांसह कोविड केअर सेंटरमध्ये काही ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नाही तर काही ठिकाणी साधा जनरेटर, कूलरही नसल्याचे वास्तव दिसून येत आहे. भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालय तसेच लाखणी येथील समर्थ महाविद्यालयातील वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तसेच लाखांदूर, तुमसर येथील अनेक कोविड सेंटरमध्ये वीजपुरवठा खंडित होताच रुग्ण घामाघूम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमान वाढले असल्याने अंगाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्ण वाढतच असल्याने सरकारने सरकारी सेंटरची संख्या वाढवली आहे. मात्र त्या तुलनेत सर्वच कोविड सेंटरवर योग्य व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने तालुकास्तरावर अनेक शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे ताब्यात घेतली असून, अनेक ठिकाणी हॉल, सभागृहांमध्ये कोरोना रुग्णांची व्यवस्था केली आहे.
प्रशासनाकडून आढावा घेऊन कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त ऑक्सिजन तसेच बेडची व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र तरी आजही अनेक ठिकाणी बेड मिळत नसल्याने तसेच काही ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाल्याचे वास्तवही नाकारता येणार नाही. त्यामुळे वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये हाच सल्ला लक्षात घेण्याची गरज आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तालुका स्तरावरील तसेच भंडारा शहरातील अनेक केअर सेंटरमध्ये रुग्णांसाठी कूलर तसेच इतर व्यवस्था वाढविण्याची गरज आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर गैरसोय टाळण्यासाठी जनरेटरचीही व्यवस्था करण्याची गरज आहे. काही ठिकाणी नियमित स्वच्छता, सॅनिटाइज होत नसल्याची तक्रारही काही रुग्णांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे.
कोट
मी तुमसर तालुक्यातील आहे. मी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालो आहे. मात्र येथे निर्जंतुकीकरण, स्वच्छता नियमित केली जाते. मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथे जनरेटर, कूलरची व्यवस्था मात्र अजून तरी झालेली नाही. पंखे सुरू असल्याने उकाड्यापासून थोडी सुटका होते. मात्र दुपारच्या वेळी रुग्ण घामाघूम होत आहेत. कूलर लावण्याची गरज आहे.
एक रुग्ण
कोट
मी भंडारा शहरातील लालबहादूर शास्त्री कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालो आहे. येथे रुग्णांची व्यवस्था नीट होत नाही. दुपारच्या वेळी घामेघूम होते. रुग्णांना दिलासा देण्यासाठी कूलर, जनरेटरची प्रशासनाने व्यवस्था तात्काळ करायला हवी.
एक रुग्ण
बॉक्स
एप्रिल तापला
मार्च महिन्यात कमाल व किमान तापमानात फारशी वाढ झालेली दिसून आली नाही. मात्र मार्च महिन्यापेक्षा आता एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला असल्याने सर्वसामान्यांच्या अंगाची लाही लाही होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात तापमानाचा पारा वाढतच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॉक्स
खासदार मेंढेंनी केली पाहणी
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या, मनुष्यबळही कमी पडत आहे. यामळे अनेक कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त आहेत. यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा सामान्य रुग्णालयास शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांना भेटी देऊन तेथील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कदम, प्रभारी शल्य चिकित्सकांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कसा आटोक्यात येईल यासंबंधी विस्तृत चर्चा केली.