भंडारा : राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास त्यास अपघाती मृत्यू घोषित करून अपघाती विमा कवच लागू करावे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्या शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर विनाअट नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांना २७ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
राज्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील संपूर्ण शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र कार्यालयीन कामकाज नियमितपणे सुरू आहे. यात शासकीय आदेशानुसार रोजच नवनवीन माहिती मागितली जात असून, या माहितीचे संकलन करण्याकरिता मुख्याध्यापक, शिक्षक यांना आळीपाळीने शाळेत जावे लागते. याशिवाय अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सेवा अधिग्रहित केल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग व पोलीस विभागाच्या पथकामध्ये शिक्षकही कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावत असून, यात अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण होऊन शिक्षक, मुख्याध्यापकांचे जीव गेले आहेत.
राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता राज्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिक शाळा तसेच आश्रमशाळा, आदी आस्थापनेत कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होऊन रोजच शिक्षकांचे जीव जात आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असून, कुटुंबातील कमावती व्यक्ती कोरोनासारख्या अकाली आजाराने दगावल्यामुळे वडीलधाऱ्या मंडळींचे औषधोपचार, शाळकरी मुलांचे शिक्षण, लग्न व दैनंदिन गरजा कशा भागवायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाल्यास त्यास अपघाती मृत्यू घोषित करून अपघात विमा कवच लागू करण्यात यावे. तसेच कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर विनाअट नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आहे. निवेदन देताना सरकार्यवाह सुधाकर अडबाले, राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबाते, विलास खोब्रागडे, दारासिंग चव्हाण, धनवीर कानेकर, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, मनोज अंबादे, अनंत जायभाये, पंजाब राठोड, श्याम गावळ, जागेश्वर मेश्राम, अनिल कापटे यांचा समावेश होता.
बॉक्स
परीक्षा शुल्क
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य मंडळाकडून परीक्षेसाठी प्रत्येकी नियमित विद्यार्थ्यांकडून ४१५ रुपये व पुनःपरीक्षार्थ्यांकडून ३९५ रुपये आकारलेले परीक्षा शुल्क पालकांना परत करण्यात यावे, आदी मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व शालेय शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव यांना विमाशि संघाने निवेदन दिले आहे.
प्रतिक्रिया:-
संपूर्ण राज्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद असून, या वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने होणारी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
यातच राज्यातील लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून, हातमजुरी करणाऱ्या पालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच परीक्षा रद्द झाल्यामुळे परीक्षा केंद्र खर्च, पर्यवेक्षक मानधन, भरारी पथक खर्च, वाहतूक खर्च किंवा इतर खर्च नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे.
सुधाकर अडबाले,
सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ.