लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लग्न समारंभासाठी परवानगी घेणे अनिवार्य केले आहे. लग्न पत्रिकेसह सबंधित तहसील कार्यालयात अर्ज केल्यानंतर लग्नाची परवानगी दिली जाते. परिणामी वधू-वरांसह कुटुंबांची परवड होत नसल्याचे चित्र आहे.कोरोनाने सर्व जगच बदलून गेले आहे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी-अधिक सर्वच देशात झाल्याने देशात २२ मार्चनंतर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लग्न सोहळ्यासाठी पाच लोकांपेक्षा अधिक यांना परवानगी नव्हती मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करीत लग्नसमारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. ही परवानगी घेण्यासाठी संबंधित वधू-वर यांनी तहसीलदारांकडे साध्या पद्धतीने अर्ज करून त्यासोबत लग्नपत्रिका जोडणे अनिवार्य आहे. लग्न सोहळ्याला परवानगी देण्याची पद्धत सुलभ असल्याने फारशी गैरसोय होत नसल्याचे चित्र आहे. लग्न समारंभातील गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये, मंगल कार्यालयात सॅनिटायझर तसेच मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे बंधन मात्र कायम आहे.
लग्नासाठी नियमावलीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून लग्नसोहळ्याला परवानगी देतानाच काही नियम घालण्यात आले आहे लग्नसमारंभाला जास्तीत जास्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. मंगल कार्यालय किंवा लग्न समारंभ स्थळ सॅनिटायझर करणे गरजेचे आहे. ही व्यवस्था असणे अनिवार्य आहे. उपस्थित प्रत्येकाने मास्क यासह फिजिकल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.
कोरणा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात जरी लग्न करायचे असले तरी परवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी एक अर्ज आणि लग्नपत्रिका जोडली की लग्नाला परवानगी मिळते. त्यामुळे आम्हाला फारशी गैरसोय झाली नाही. - धनपाल गिरीपुंजे, वरपिता, खरबी (नाका)
परवानगीसाठी सुलभ प्रक्रीयालग्नसोहळ्यासाठी परवानगी घेताना वधू-वर पित्याची तसेच वऱ्हाडी मंडळींची दमछाक होऊ नये, म्हणून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय स्तरावर परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लग्नपत्रिकेत लग्नस्थळ उल्लेख असणे व परवानगी अर्ज जोडले की विहित कालावधीत सदर लग्न सोहळ्यासाठी परवानगी दिली जाते.
लग्नसमारंभासाठी परवानगी घेण्याची पद्धत फारच किचकट असेल, असे वाटले होते. परवानगी घेण्यासाठी जास्त धावपळ करावी लागली नाही. आवश्यक कागदपत्र व लग्नपत्रिका जोडून अर्ज सादर करणे महत्वाचे आहे. सदर बाबतीत शासकीय कर्मचारी यांचे वेळीच सहकार्य मिळाल्याचे समाधान आहे. - माणिक उरकुडे, वधूपिता