लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरू करण्याबाबतचे पत्र पुणे येथील प्राथमिक शिक्षण संचालकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. जिल्ह्यात १० शाळांमधील आरटीईच्या ७७० प्रवेशपात्र जागा उपलब्ध असून त्यापैकी ७६० जागांवर प्रवेशाची मंजुरी प्राप्त झाली आहे. तर ६९० अर्ज प्रतीक्षेत आहेत. शाळा सुरू झालेली असताना विलंबाने का होईना अडकलेली प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागाने ०९ फेब्रुवारी रोजी अधिसूचना काढली होती. त्यास मुंबई उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती असल्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली नव्हती. उच्च न्यायालयाने जनहित याचिका व रिट याचिकेवर १९ जुलै रोजी अंतिम निर्णय दिला.
त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ७ जून २०२४ रोजी काढण्यात आलेल्या सोडत, निवड यादी व प्रतीक्षा यादी २० जुलै रोजी संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावर २२ जुलै पासून एसएमएस पाठविण्यात येत आहे. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी २३ ते ३१ जुलै पर्यंत संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
आरटीई प्रवेशासंबंधीची सध्यस्थितीतालुका शाळा उपलब्ध जागा निवड झालेले विद्यार्थी प्रतीक्षेतील विद्यार्थीभंडारा २३ २१७ २१७ २०२मोहाडी १६ ११८ ११८ १०८तुमसर १६ १५९ १५० १४१साकोली १० ८७ ८६ ७२लाखनी ०८ ७८ ७८ ७७लाखांदूर ०५ २४ २४ १३पवनी १२ ८७ ८७ ७७एकूण ९० ७७० ७६० ६९०
पालकांनी आरटीई पोर्टलवरील स्थिती पहावीसन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांनी प्रवेशासाठी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती बालकाचा अर्ज क्रमांक टाकून पाहावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.- वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), भंडारा.