गोंदिया : खजरी ते खोडशिवणीदरम्यान असलेल्या चूलबंद नदीवरील दोन पुलांच्या बांधकामांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या पाठपुराव्याला प्रदीर्घ काळानंतर यश आल्याने त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल व आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे आभार मानले.
गोंदिया - कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३वर खजरी हे गाव आहे. या गावापासून ५ किमी अंतरावर खोडशिवणी गाव आहे. हा इतर जिल्हा मार्ग क्र. ८४ असून, पुढे खोडशिवणी - गिरोला - साकोली असा आहे. खोडशिवणी या गावाला जाण्यासाठी पूर्वी रस्ताच नव्हता. खा. पटेल हे प्रथम खासदार झाले तेव्हा गंगाधर परशुरामकर यांच्या आग्रहावरून त्यांनी रस्ता बांधकामासाठी प्रयत्न केले व हा रस्ता तयार झाला. या रस्त्यावर बोथली ते म्हसवाणी तसेच म्हसवाणी ते खोडशिवणीदरम्यान चूलबंद नदीवरील दोन छोटे पूल आहेत. पावसाळ्यात या पुलांवर पाणी राहत असल्याने वाहतूक बंद होत होते. गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात रमेश शुक्ला हे कार्यकारी अभियंता असताना खासदार पटेल यांच्या सूचनेवरून त्यांनी दोन पुलांचे प्रस्ताव तयार केले होते. तेव्हा दोन्ही पुलांसाठी केवळ बारा लाखांचा निधी मंजूर झाला होता. पर्याप्त निधी उपलब्ध झाला नसल्याने दोन्ही ठिकाणी रेज कॉजवे बांधण्यात आले होते. आजही ते कायम आहेत. परंतु पावसाळ्यात पुलावर पाणी राहत असल्याने वाहतूक खोळंबते. या ठिकाणी उंच पूल होण्यासाठी परशुरामकर यांचा कायम पाठपुरावा सुरू होता.
९ कोटी ७४ लाख रुपये होणार खर्च
२१ एप्रिलच्या शासन निर्णयान्वये दोन्ही पुलांच्या बांधकामाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून खजरी-गिरोला साखळी क्र १/८५० करिता ५ कोटी ४० लाख ४५ हजार व खजरी - गिरोला साखळी क्र ३ / ७०० करिता ४ कोटी ३३ लाख ७२ हजार असे एकूण ९ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये व पाच वर्षे देखभाल -दुरुस्तीसाठी वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय घोटी, घटेगाव, माहुली, वडेगाव, गोंगले व बकीटोला या पुलांच्याही बांधकामाला मंजुरी देण्यात आली.