यंदा धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने नियोजन केले आहे. नेहमीप्रमाणेच यावर्षीही धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्णत: करण्यात आल्यानंतरही अद्यापही केंद्र मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी पायपीट होत आहे. यावर्षी धानाला प्रतिक्विंटल १८६८ ते १८८८ रुपये हमीभाव आणि ७०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. मात्र, भंडारा तालुक्यातील धारगाव जिल्हा परिषदेत अंतर्गत असलेल्या जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्र नसल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात धानपीक हे प्रमुख पीक असून चांगले उत्पादन होऊनही धान केंद्र परिसरात जवळ नसल्याने व्यापाऱ्यांना कवडीमोल किमतीत धान विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसून विक्रीसाठी वाहतुकीचा खर्च अधिक येत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून सोडविण्यासाठी खुटसावरी येथे धान केंद्र मंजूर करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष शेषराव शेंडे, नीळकंठ कायते, ओमप्रकाश गिऱ्हेपुंजे, बाबूराव मस्के, पतीराम गिऱ्हेपुंजे, देवानंद मस्के, रामा झंझाळ, पवन वासनिक, अनिल कडव, रजत हर्ष, दिगंबर गाढवे, श्रावण दिघोरे, आसाराम शेंडे, भीमराव वाहणे, धनराज गायधने, सुखदेव मस्के, वैद्य, चेतन चेटूले, प्रभुदासे टेटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.