मागील तीन-चार महिन्यांपासून जिल्हा परिषद भंडारा येथे सादर केलेले जीपीएफ नापरतावा कर्ज प्रकरणे बीडीएस निघत नसल्यामुळे प्रलंबित होती. उशिरा होणारे पगार, कोरोना काळात उपचारावर झालेला खर्च, मुला-मुलींचे लग्न, पतसंस्थेच्या कर्जाची किस्त अशा अनेक कारणास्तव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे कर्ज प्रकरणे सादर केले होते. परंतु, मागील तीन महिन्यांपासून ऑनलाईन बीडीएस प्रणाली बंद झाल्यामुळे बीडीएस निघत नसल्याने कर्ज प्रकरणे मंजूर होत नव्हती. त्यामुळे शिक्षकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, २८ मे रोजी बीडीएस प्रणाली सुरू झाल्यामुळे प्रस्तावित सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, संचालक नामदेव गभने, तालुका सरचिटणीस ईश्वर निकुडे यांनी जिल्हा लेखा वित्त अधिकारी जाधव यांची भेट घेतली असता वित्त अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना दालनात बोलावून आज तारखेपर्यंत सादर सर्व कर्ज प्रकरणाचे बीडीएस काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच पगारासाठी निधी प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून वारंवार होणारी अडचण दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा भंडाराच्या वतीने करण्यात आली.
प्रलंबित नापरतावा जीपीएफ प्रकरणे तत्काळ मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:26 AM