लाखांदूर तालुक्यात यंदाच्या खरीपात एकूण १४ आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत धान खरेदी केली जात आहे. सदर केंद्रात लाखांदूर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थांतर्गत आठ, विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्थांतर्गत चार व मासळ येथील पंचशील भात गिरणी सहकारी संस्थांतर्गत दोन केंद्रांचा समावेश आहे. सदर केंद्रांतर्गत जवळपास अडीच लाख क़्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी होताना ६० धान गोदामे फुल्ल झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे शासनाने खरेदी झालेल्या धानाची उचल होण्याहेतू उचल आदेश निर्गमित न केल्याने पुढील दिवसात उघड्यावर धान खरेदी केली जाणार असल्याची माहिती आहे. या परिस्थितीत तालुक्यातील पिंपळगाव येथे जवळपास ३० हजार मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उपलब्ध असल्याने संबंधित गोदामात सुरक्षिततेच्या दृष्टीने धान खरेदीला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, गतकाळात तालुक्यात उघड्यावर धान खरेदी झाल्याने हजारो क़्विंटल धानाची नैसर्गिक व अन्य कारणांनी नासाडी झाल्याच्या विविध घटनांची शासन प्रशासनाला माहिती असतानादेखील उघड्यावर धान खरेदी सर्वत्र संतापजनक ठरणार असल्याचे बोलल्या जात आहे.