धान उत्पादक संकटात : कृषी फिडरचे भारनियमन रद्द करण्याची मागणीलाखनी : तालुक्यातील शिवनी, मोगरा, धाबेटेकडी येथील कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी स्थानिक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभागीय कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढून कृषी फिडरचे भारनियमन रद्द करण्याची मागणी केली तसेच शिवनी परिसरात कायमस्वरुप विज कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना धानपिका वाचविण्यासाठी कृषी फिडरला सतत विद्युत पुरवठ्याची गरज असते. धानाचे उत्पादन परिपक्वतेकडे आहे. पंरतु भारनियमनामुळे पाण्याचा पुरेसा पुरवठा करता येत नाही. धानपिक सुकत असल्यामुळे उन्हाळी धानपिक सुकत असल्यामुळे उन्हाळी धानपिक काढणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न मोर्चा काढून निषेध नोंदविला आहे.दिवसभरातुन १६ तास विद्युत पुरवठा देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु आश्वासनाची पुर्तता विद्युत विभाग व शासनाकडून झालेली नाही. १६ तास विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक देण्याची मागणी केली आहे. अर्धनग्न मोर्चा पंचायत समिती सदस्य दादु खोब्रागडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. याप्रसंगी डोलीराम हारगुडे, बाबुराव शेंडे, मोहन कुथे, विजय आठोडे, विलास राऊत, बाबाराव शेंडे, राजु शेंडे, रवी काळे, सागर काळे, राकेश बावणकर, रिंकेश वाघाये, संदिप नागलवाडे, बालु सपाटे, राकेश सार्वे, रवी सार्वे, संदिप बावनकर, विनोद शेंडे, अभिलाष खंडाते आदी परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. याप्रसंगी उपविभागीय अभियंता पी. एफ. आंभोरे यांना निवेदन देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
भारनियमनाविरोधात अर्धनग्न मोर्चा
By admin | Published: April 02, 2016 12:30 AM