बॉक्स
त्या आठ गावांचे नोटिफिकेशन केव्हा?
उमरेड-करांडला-पवनी अभयारण्य प्रकल्पाची निर्मिती होऊन आज सात वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र पवनीच्या पश्चिम दिशेला असलेल्या पाऊणगाव, गायडोंगरी, कवडशी, आवळगाव, मुरुमगाव, चिचखेडा, धामणगाव, जोगीखेडा या आठ गावच्या शेतजमिनी शासनाने अधिग्रहित केल्या नसल्याने येथील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. वाघाचा संचार असल्याने जमिनीचा हंगाम करू शकत नाही. एकंदरीत इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सदर गावे प्रकल्पग्रस्त गावांच्या यादीत येण्यासाठी लोकांनी आवाज उठविल्याने तत्कालीन शासनाने परिणय फुके पालकमंत्री असताना प्रयत्न चालविले होते. परिणामी प्रस्तुत गावांच्या नोटिफिकेशनची फाईल शासनाकडे पोहोचली आहे. सरकार बदलले आणि सदर फाईलकडे दुर्लक्ष असल्याने अनाथासारखी स्थिती असताना फाईलचा वाली कुणी नाही का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित करण्यात येत असून प्रस्तुत गावांच्या नोटिफिकेशनची कार्यवाही केव्हा? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
बॉक्स
स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन?
मागील शासनाच्या काळात पाऊणगाव, गायडोंगरी, कवडशी, आवळगाव, मुरुमगाव, चिचखेडा, धामणगाव, जोगीखेडा ही आठ गावे प्रकल्पग्रस्त घोषित व्हावे म्हणून मंत्रालयापर्यंत नोटिफिकेशनसाठी मजल मारण्यात आली. सदर फाईल शासन दरबारी पडून असून तिला धक्का मारण्यासाठी कुणीही स्थानिक लोकप्रतिनिधी पुढे येताना दिसत नाही. क्षेत्राला शासनातीलच आमदार म्हणून नरेंद्र भोंडेकर आहेत. महाराष्ट्र शासनाकडे सदर प्रस्ताव अडून असल्याने धक्का मारण्याची गरज असल्याची खात्रीलायक माहिती आहे. आमदार भोंडेकरांनी प्रस्तुत गावातील जनतेच्या व्यथा समजून घेऊन नोटिफिकेशन करवून घ्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा असे नाही झाल्यास स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन आहेत का? असा संभ्रम जनतेत निर्माण होईल.