भंडारा: सरत्या वर्षात स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रिव्हॉलर, चार काडतुसांसह चौघांना अटक केली आहे. ही धाडसी कारवाई मंगळवारला दुपारी भंडारा शहरातील शीतला माता मंदिराजवळ करण्यात आली. यात दोन जण फरार असल्याचेही पोलिस सुत्रांनी सांगितले. तुमसर येथे २५ सप्टेंबरला नईम शेख यांची हत्या करण्यात आली होती. आज अटक केलेल्या आरोपींचा या हत्यांकाडाशी कनेक्शन आहे का? याचाही शोध घेण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांना काही अज्ञात गुंड प्रवृत्तीचे इसम भंडारा शहरात आल्याची माहिती मिळाली. उल्लेखनीय म्हणजे मंगळवारी दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पकडण्यात आलेले चारही इसम हे तुमसर येथील रहिवासी होते.
भरगच्च वस्तीतून जात असताना घडलेल्या कारवाईने खळबळ उडाली. वर्षभरात खूनाच्या तब्बल २५ घटना व खुनाच्या प्रयत्नाच्या घटनातही वाढ झाल्याचे दिसून आले. सरत्या वर्ष संपायला पाच दिवसांचा कालवाधी शिल्लक असतानाच रिवाल्वरसह चार जिवंत काडतुसे या चौघांच्या ताब्यातून जप्त करण्यात आली.
सर्व चारही व्यक्ती तुमसर येथील रहिवासी आहेत. एखाद्या मोठ्या घटनेला अंजाम देण्यासाठी तर भंडारा शहरात आले नव्हते, याचाही तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईदरम्यान फरार असलेले दोन इसमांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. भंडारा पोलिस ठाण्यात रात्र उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू असल्याने अटक केलेल्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही.
नईम शेख हत्याकांडाशी कनेक्शन?
रेती व मॅग्निज व्यावसायिक नईम शेख यांची गोबरवाही रेल्वे फाटकासमोर २५ सप्टेंबर २०२३ ला बंदुकीतुन गोळ्या व धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला होता. या प्रकरणाशी आज अटक केलेल्या इसमांचा कनेक्शन तर नाही, याचाही शोध घेण्यात येत आहे. शेख हत्या प्रकरणात एकूण ११आरोपींचा समावेश आहे. अन्य घटनांवरही लक्ष केंद्रीत करून पोलिसांचा तपास सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व तुमसर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक रिव्हाल्वर व चार काडतुसे जप्त केली. फरार आरोपींच्या शोधात पथक पाठविण्यात आले आहे. या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.- लोहित मतानी, पोलीस अधीक्षक, भंडारा.