लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला केलेल्या जबर मारहाणीत ती बेशुद्ध पडली. त्यात तिचा मृत्यू झाला असावा या भीतीमुळे तिला रेल्वे रूळावर नेऊन टाकले. त्यानंतर पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली. खुनाच्या घटनेला आत्महत्याचे स्वरूप देण्याचा केलेला त्याचा प्रयत्न वरठी पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी पती व त्याच्या भावाला अटक केली. न्यायालयाने या दोघांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनाली जोशेल शिंदे (२७) रा.वरठी असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती जोशेल शंकरनाथ शिंदे (३०) व त्याचा भाऊ जयेश शिंदे (२७) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. जोशेल हा पत्नी सोनालीसह वरठी येथील हनुमान वॉर्डात राहत होता. जोशेल हा नेहमी पत्नी सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला मारहाण करणे, घराबाहेर काढणे असा त्रास द्यायचा. ७ एप्रिलच्या रात्री जोशेलने सोनालीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यात ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिचा मृत्यू झाला असावा समजून जोशेल व त्याचा भाऊ जयेशने तिला स्वत:च्या चारचाकी वाहनाच्या डिक्कीत टाकून रेल्वे रूळावर आत्महत्या केल्याचा कट रचला होता. दुसऱ्या दिवशी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार जोशेलने वरठी पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. रेल्वे रूळावर महिला पडून असल्याचे रेल्वे पोलिसांना कळले. रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती वरठी पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी जोशेल शिंदेला बोलावले. ओळख पटल्यानंतर वरठी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात पती जोशेल त्याचा भाऊ जयेश व जोशेलची आईने तिला बेदम मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हिसका दाखविताच खुनाची कबुली दिली. याप्रकरणी वरठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून २६ मेच्या रात्री पती व त्याच्या भावाला अटक केली. या तपास उपनिरीक्षक कमलेश सोनटक्के व सहाय्यक हवालदार त्रिमूर्ती लांडगे, योगेश मोहतुरे, नंदकिशोर मारबते व संदीप बांते हे करीत आहेत.- तर आत्महत्या ठरली असतीसोनालीला मारहाण केल्यानंतर तिला बेशुध्द अवस्थेत रेल्वे रूळावर टाकण्यात आले. रूळावरून रेल्वे गेली असती तर आत्महत्या किंवा तो अपघात ठरला असता. परंतु रेल्वे रूळावर फेकल्यानंतर सोनालीला शुद्ध आल्यानंतर ती रेल्वे रूळाच्या खाली आली. त्यामुळे ती बचावली होती. रेल्वे पोलिसांनी तिला रूग्णालयात दाखल केल्यानंतर ती जिवंत होती. शुद्धीवर आल्यानंतर ती बाजूला झाली नसती तर आरोपींना आत्महत्या किंवा अपघात ठरवता आले असते. परंतु सत्य पोलिसांनी शोधून काढलेच. पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्यसोनालीचा मृत्यू हा अपघाती किंवा आत्महत्या नसून खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना सुरूवातीलाच आला होता. परंतु, वैद्यकीय अहवालातील विसंगती, उपलब्ध पुरावे आणि साक्षीदार नसल्यामुळे पोलिसांना या खुनाचा छडा लावणे कठिण जात होते. परंतु तत्कालीन ठाणेदार गणेश खंडाते यांनी कौशल्य पणाला लावून तपासाला दिशा दिली. सुरूवातीपासून आरोपींच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन आवश्यक ते पुरावे गोळा केले. त्यामुळे आरोपीना अटक करण्यात मदत झाली. पोलीस उपनिरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी तपासचक्रे फिरवून २४ तासात दोन आरोपीना अटक केली. या घटनेचा छडा लावण्याचे श्रेय पोलिसांना जाते.
खुनाच्या आरोपात पतीसह दिराला अटक
By admin | Published: May 28, 2017 12:25 AM