पत्र परिषद : माजी आमदार भोंडेकर यांची मागणीभंडारा : भाजपचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे कृत्य लोकशाही व्यवस्थेला अशोभनीय आहे. ज्या पोलिसांच्या भरोश्यावर आमदार सुरक्षीत असतात, अश्या पोलीस कर्मचाऱ्यांना आमदार मारहाण करीत असतील तर या प्र्रकाराचा आम्ही निषेध करतो. आमदार अवसरे यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. येथील विश्रामगृहात आज शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सुरेश धुर्वे व अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. भोंडेकर म्हणाले, घटनेच्यावेळी संबंधित व्यक्ती मद्यप्राशन करुन होते काय यावरही तपास व्हायला हवा. घटना गंभीर असतांनाही पोलीस प्रशासनाने हव्या त्या गतीने कारवाई केली नाही. परिणामी अश्या निष्क्रीय पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई केली पाहिजे. जिल्ह्यात महिला रुग्णालय, गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत पुर्नवसन, दुष्काळ आदी ज्वलंत समस्या असतांना आमदार कधीही उग्र होताना बघितले नाही, मात्र त्यांच्या वाहनचालकाला कानशिलात हाणताच ते उग्र झाले. ते जनतेचे आमदार आहेत की वाहनचालकाचे अशा उपरोधीक टोला भोंडेकर यांनी लावला. सत्तेचा माज चढलेल्या अश्या लोकप्रतिनिधीची आमदारकी रद्द करावी अशी मागणीही भोंडेकर यांनी केली. (प्रतिनिधी)विद्युत क्रीडा मंडळातर्फे अवसरे यांचा निषेधमोहाडी : विद्युत क्रीडा मंडळ मोहाडीतर्फे आमदार अवसरे यांचा मारहाण प्रकरणाचा जाहिर निषेध करण्यात आला असून अटकेची मागणी करण्यात आली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अश्या राजु साठवणे हा विद्युत क्रीडा मंडळाचा माजी खेळाडू आहे. त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मंडळाने दिला आहे. आमदारांना अटक का करण्यात आली नाही?, त्यांच्यासाठी कायदा वेगळा आहे काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. अवसरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंडळाचे अध्यक्ष सुर्यकांत सेलोकर, नत्थु पिकलमुंडे, वसंता निखाडे, सुधीर पडोळे, जयसींग आगाशे, गणेश वानखेडे, पप्पु समरित आदींनी केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने उद्या २० आॅगस्ट रोजी मोहाडी शहर बंद ची हाक दिली आहे. या आशयाचे पत्र शहर अध्यक्ष शोमल गजभिये यांनी काढले आहे.
अवसरेंना अटक करा
By admin | Published: August 20, 2016 12:16 AM